आष्टणकर, वैद्य, कुंदा राऊत यांना अच्छे दिन!

ZP-Nagpur
ZP-Nagpur

नागपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीने काहींच्या अपेक्षा उंचावल्या तर काहींचा पार हिरमोड झाला आहे. नव्या आरक्षणानुसार कधीकाळी जिल्हा परिषदेचा आखाडा गाजविणारे बाबा आष्टणकर, माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य,कुंदा राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे माजी अध्यक्ष रमेश मानकर, माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे यांना नवे मतदारसंघ शोधावे लागतील किंवा पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे.  

दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे राजकारण तत्कालीन सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर, रमेश मानकर, बंडू उमरकर यांच्याभोवती केंद्रीत होते. त्यांच्यासोबतचे चंद्रशेखर बावनकुळे  यांना ‘लिफ्ट’ मिळाली आणि ते राज्याचे ऊर्जामंत्री झाले. मात्र, आरक्षणामुळे बाबा आष्टणकर, मानकर, उमरकर राजकीयदृष्ट्या मागे पडले. मात्र यापैकी कुणीही थांबले नाहीत.

मानकर ॲग्रो व्हीजनच्या मार्गावर निघाले. आष्टणकरांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन दुसऱ्या मतदारसंघातून नशीब आजमावले. पण त्यांना यश मिळाले नाही. उमरकरांना करण्यासारखे काही नसल्याने त्यांनी पाच वर्षे प्रतीक्षा केली. तथापि प्रतीक्षा फळाला आली नाही आणि यावेळीही आरक्षणाने पुन्हा एकदा उमरकरांचा घात केला. त्यांचा जलालखेडा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. मागील निवडणुकीत मतदारसंघ महिलेसाठी आरक्षित झाल्याने रमेश मानकर यांनी पत्नीला उभे करून सत्तेची दोरी आपल्याकडे ठेवली. मात्र, यंदा तीही सोय राहिली नाही. त्यांचा धापेवाडा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. आरक्षणामुळे आजूबाजूलाही घुसखोरी करण्याची संधी त्यांना राहिली नाही. गावंडे परिवारासाठी राखीव समजला जाणारा सोनेगाव निपानी एससी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. पाना गावंडे, नाना गावंडे, सुनीता गावंडे आणि संध्या गावंडे अशा एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे. तरुण आणि आश्‍वासक चेहरा म्हणून हर्षवर्धन निकोसे यांनी दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत प्रवेश केला होता.

समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. ज्या आरक्षणाने त्यांना संधी दिली त्याच आरक्षणामुळे त्यांना जिल्हा परिषदेतून बाहेर ठेवले. कारण  त्यांचा करभाड मतदारसंघ ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. दहा वर्षे सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात  सत्तेच्या बाहेर असेण कुठल्याही नेत्यासाठी कठीण काळ असतो. 

रामटेक तालुक्‍यातून शिवसेनेने अनेक नेते जिल्हा परिषदेला दिले. त्यात तापेश्‍वर वैद्य, देवेंद्र गोडबोले यांचा समावेश होता. या दोघांना लढण्याची संधी यंदा मिळणार आहे. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मामा राऊत यांचा वारसा कुंदा राऊत चालवित आहे. त्याच पाच वर्षे  सदस्यसुद्धा होत्या. यंदा त्यांचा गोधनी मतदारसंघ ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. यामुळे कुंदा राऊत पुन्हा जिल्हा परिषदेत एंट्री करण्याची शक्‍यता आहे.

धानल्यात टशन 
मौदा तालुक्‍यातील धानला चिरव्हा मतदारसंघात यंदा चांगलीच टशन होणार आहे. अध्यक्ष निशा सावरकर यांचा मतदारसंघ सर्वांसाठी खुला झाला आहे. यामुळे त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर लढण्याची शक्‍यता आहे. तसेच झाल्यास माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे. सावरकर-वैद्य यांचे परंपरागत राजकीय शत्रुत्व आहे. चर्चा आणि समझोता दोघांच्याही शब्दकोशातच नाही. याच दुश्‍मनीमुळे दोघांनी मागील निवडणुकीत खात सर्कलमधून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली होती. यात दोघेही पराभूत झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com