कुंभारे, चव्हाण, गेडामांना आरक्षणाचा फटका

कुंभारे, चव्हाण, गेडामांना आरक्षणाचा फटका

नागपूर - जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत बहुतांश मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, समाजकल्याण सभापती दीपक गेडाम अडचणीत आले आहेत. त्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. आजूबाजूला लढण्याची सोय राहिली नसल्याने त्यांना पाच वर्षे आराम करावा लागणार आहे. आरक्षणाच्या फेऱ्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर बचावले आहेत. सोडतीचा ५८ पैकी तब्बल ३० विद्यमान सदस्यांना फटका बसला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मंगळवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका चिमुकलीच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सोडतीमुळे नाराज झालेल्यांनी न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच वर्षभर लांबलेली निवडणूक पुन्हा लांबण्याची शक्‍यता आहे. 

कळमेश्‍वर 
कळमेश्‍वर तालुक्‍यात तेलकामठी, धापेवाडा व नवा गोंडखैरी मतदारसंघात प्रस्थापितांना जागा शोधणेही कठीण झाले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांचा तेलकामठी अनुसूचित जमाती महिला, माजी जि. प. अध्यक्ष रमेश मानकर यांचा धापेवाडा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी तर नवा गोंडखैरी मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. यामुळे तिघांचीही गोची झाली आहे. 

नरखेड
नरखेड तालुक्‍यातील चारही मतदारसंघाचे आरक्षण बदलले आहे. शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांचा बेलोना मतदारसंघ अनुसूचित जाती महिला, सावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, जलालखेडा अनुसूचित जाती, भिष्णूर मतदारसंघ इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे विद्यमान सदस्य पुन्हा तालुक्‍यातील कोणत्याही मतदारसंघातून लढू शकणार नाहीत. 

काटोल 
काटोल तालुक्‍यातील चारही जि. प. मतदारसंघांचे आरक्षण बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा व कोंढाळी मतदारसंघ खुल्या प्रवर्गातून महिलांसाठी राखीव झाला. येनवा, पारडसिंगा मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव झालेत.

सावनेर
सावनेर तालुक्‍यातील सर्व मतदारसंघांचे आरक्षण बदलले आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या चिचोली मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. 

कामठी 
नाना कंभाले यांचा महादुला-कोराडी महिलांसाठी राखीव झाला. गुमथळा ओबीसी, वडोदा ओबीसी महिला, येरखेडा मतदारसंघ खुला झाला. आहे.

मौदा 
जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांचा मौदा तालुक्‍यातील धानला चिरव्हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गात आला आहे. यामुळे त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात. नंदा लोहबरे यांचा तारसा चाचेर खुल्या प्रवागात गेला आहे. त्यामुळे त्यांना अडचण नाही. खात निमखेडा एससी महिला तर अरोली कोदामेंढी ओबीसींसाठी खुला झाला आहे. 

हिंगणा 
वानाडोंगरी नगर परिषद झाल्याने माजी जि. प. अध्यक्ष संध्या गोतमारे यांना नवी जागा शोधावी लागणार आहे. रायपूर खुला झाला असल्याने माजी सदस्य बाबा आष्टणकर यांना दिलासा  मिळला. नीलडोह सर्वसाधारण, डिगडोह ओबीसी महिला, डिगडोह-इसासनी ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. सातगाव एसटी महिला, खडकी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला. 

उमरेड 
मकरधोकडा सर्वसाधारण, वायगाव सर्वसाधारण महिला, बेला सर्वसाधारण महिला, सिरसी एससीसाठी राखीव आहे.

कुही 
राजोला ओबीसी, वेलतूर सर्वसाधारण महिला, सिल्ली सर्वसाधारण महिला, मांढळ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. मांढळमुळे उपासराव भुते अडचणीत आले आहे. 

भिवापूर
तालुक्‍यात फक्त दोनच मतदारसंघ असून कारगाव एसटी, नांद एससी दोन्ही राखीव झाले आहे. कारगावच्या दीपाली इंगोले यांना आरक्षणाचा फटका बसला असून नंदा नारनवरे यांना सोयीचे झाले आहे. 

रामटेक
रामटेक तालुक्‍यात पथरई कडंबा सर्वसाधारण, बोथिया-पालोरा-उमरी ओबीसी आणि कांद्री-सोनेघाट सर्वसाधरण महिला, मनसर- शीतलवाडी सर्वसाधारण, नगरधन -भंडारबोडी सर्वांसाठी खुला झाला आहे. 

पारशिवनी
माहुली सर्वसाधारण, करंभाड ओबीसी महिला, गोंडेगाव खुला, टेकाडी एससीसी महिलांसाठी आरक्षित आहे. टेकाडीचे शिव यादव यांना आरक्षणामुळे दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. 

नागपूर ग्रामीण 
गोधनी-रेल्वे ओबीसी महिला, दवलामेटी सर्वसाधरण, सोनेगाव निपानी एससी महिला, खरबी एससी, बेसा एससी महिला, बोरी ओबीसी, बोरखडी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. सोनेगाव निपानीमुळे विद्यमान सदस्य संध्या गावंडे अडचणीत आल्या आहेत. खरबीच्या शुभांगी गायधनी यांनाही पाच वर्षे आराम करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com