‘तू तिथं मी’... तर काही ठिकाणी ‘तू तू-मैं मैं’...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर - जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघात बदल झाले आहेत. मागील निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेले मतदारसंघ खुले झाले आहेत.  दुसरीकडे पुरुषांचे मतदासंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामुळे ‘तू तिथं मी’ असे बदल अनेक मतदारसंघात होणार आहेत तर काही ठिकाणी तू तू मैं मैं... होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. 

नागपूर - जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघात बदल झाले आहेत. मागील निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेले मतदारसंघ खुले झाले आहेत.  दुसरीकडे पुरुषांचे मतदासंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामुळे ‘तू तिथं मी’ असे बदल अनेक मतदारसंघात होणार आहेत तर काही ठिकाणी तू तू मैं मैं... होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्हा परिषदेच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक महिला सदस्यांनी आपली छाप सोडली. चांगल्या कामाचीही पावती त्यांना मिळाली आहे. संध्या गोतमारे आणि निशा सावरकर यांनी अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे यांच्यासोबत सदस्या वर्षा धोपट, भारती गोडबोले, कुंदा आमधरे, शकुंतला हटवार, कल्पना चहांदे आदींनी आपली ओळख निर्माण केली.  अध्यक्ष निशा सावरकर यांचा मतदारसंघ सर्वांसाठी खुला झाला आहे. त्यांचे पती टेकचंद  सावरकर यापूर्वी सदस्य होते. त्यांना जिल्हा परिषदेत सक्रिय व्हायचे आहे. यामुळे दोघांनाही लढण्याची संधी आहे. यामुळे कोणी लढायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागील निवडणुकीत दोघेही वेगवेगळ्या मतदारसंघातून लढले होते. मात्र, टेकचंद यांना पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांचा मूळ धानला चिरव्हा मतदारसंघ खुला झाला आहे. 

कल्पना चहांदे यांचा साटक खुला झाला आहे. येथे शंकर चहांदे दावा करू शकतात. कृषी सभापती आशा गायकवाड मनसर शीतलवाड हासुद्धा खुला झाला आहे. त्यांचे पती सुरेश गायकवाड येथून लढण्यास इच्छुक असल्याने आशा यांचा हिरमोड होणार आहे. भारती गोडबोले यांचा अरोली कोदामेंढी ओबीसी प्रवार्गासाठी खुला झाला आहे. यामुळे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले पुन्हा परतण्याची शक्‍यता आहे. महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांचा मकरधोकडासुद्धा खुला झाला आहे. यामुळे घरूनच त्यांना आव्हान दिले जाऊ शकते. नगरधन मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने वर्षा धोपटेंचे पती नरेश धोपटे येथून लढण्यास इच्छुक आहेत. शकुंतला हटवार यांचा अरोली कोदामेंढी ओबीसीसाठी खुला झाल्याने अशोक हटवार यांनाही जिल्हा परिषदेचे वेध लागले आहेत.

Web Title: nagpur vidarbha news zp reservation draw politics