आलिया भोगासी, असावे सादर!

आलिया भोगासी, असावे सादर!

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदीची घोषणा सुवर्णाक्षरात कोरली जाणार की नाही, हे भविष्यात कळेलच. मात्र, नोटाबंदीच्या वर्षभरानंतरची स्थिती काही फारशी समाधानकारक नाही. एटीएममधला ठणठणाट, बाजारातील मंदी, नोकऱ्यांवर आलेली गदा, अर्थव्यवस्थेतला लोप पावत असलेला उत्साह, दैनंदिन व्यवहारात होणारा त्रास आदी गोष्टी अंगवळणी करत सर्व घटकांनी निर्णय स्वीकारल्याचे चित्र आहे.

‘आलिया भोगासी असावे सादर’ म्हणत निर्णयानंतरच्या परिणाम-दुष्परिणामांना सामोरे जाण्याची कसरतदेखील सुरू आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट चलन आणि दहशतवादाची समस्या सोडविण्यासाठी घेण्यात आलेल्या हा निर्णय चारही क्षेत्रात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाच या निर्णयाचे परिणाम अद्याप अस्पष्ट आहेत. निर्णयाचे स्वागत करून भविष्यात परिणाम चांगले दिसतील असा घोषा होत असतानाच परिणाम कधी आणि कसे दिसणार याबाबत स्पष्टता नाही, असा सूर नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजिण्यात आलेल्या ‘सकाळ’ चर्चासत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.

नोटाबंदीमुळे फायदे, पण अर्थव्यवस्थेचे नुकसान 
- प्रशांत सरोदे,  माजी अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र

नोटाबंदीच्या निर्णयाचे सरकारला अपेक्षित लाभ दिसायला आणखी काळ लागेल. पण, नोटाबंदीमुळे झालेल्या मानसिक खच्चीकरणाचे परिणाम आजही दिसत ओत. बाजारपेठा ठप्प असून सर्वत्र मंदीचे सावट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे नोटाबंदीचे काही फायदे दिसलेत तसे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेचे नुकसानही झाले. कदाचित या निर्णयाचे लाभ दिसायला आणखी काळ लागेल. पण, आजतरी दुष्परिणाम दिसून येत आहेत. केवळ टीव्ही, मोबाईल, फ्रीज वगळता अन्य सर्वच साहित्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यातही दुखणे मांडायचे कुणापुढे, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. पाठोपाठ घेण्यात येणाऱ्या निर्णय घेण्यात येत आहेत. यावरून सरकारला प्रत्येक गोष्टच करण्याची घाई झाल्याचे भासत आहे. नोटाबंदीनंतरचे चार महिने नागरिक चांगलेच ‘पॅनिक’ होते. रोजगार बुडवून नोटा बदलविण्यासाठी रांगेत लागावे लागले, आत ती परिस्थिती ओसरली असली तरी अच्छे दिनची शाश्‍वती अद्याप नाही.
 

रोखीने देणग्या कमी, पण ऑनलाइनमधून वाढ
- अविनाश शेगावकर, सचिव, साईबाबा सेवा मंडळ

नोटाबंदीची घोषणा झाली त्या काळात मंदिरात येणाऱ्या देणग्यांवर परिणाम झाला. पण, आता देणग्यांचे प्रमाण पूर्ववत झाले असून ऑनलाइन स्वरूपात मिळणाऱ्या देणग्यांमध्ये वाढ झाली. नोटाबंदी हा केंद्र सरकारचा निर्णय धाडसी निर्णय असून त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या काळात दिसतील. प्रारंभीच्या काळात मात्र, बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मंदिरात जुन्या नोटा येण्याचे प्रमाण वाढले तर चलनातील नोटा कमी झाल्या. नोटा बदलून घेण्यासाठी काही काळ थांबावे लागले होते. आता सर्वकाही पूर्ववत झाले आहे. नोटाबंदीपूर्वी रोखीने येणाऱ्या देणग्यांचे प्रमाण अधिक होते. आता रोखीने येणाऱ्या देणग्या कमी झाल्या असून स्वॅपींग मशीन किंवा ऑनलाइन पद्धतीने येणाऱ्या देणग्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. रकमेचा विचार केल्यास मात्र पूर्वी आणि आताचे प्रमाण सारखेच आहे. 

ज्येष्ठांना आधी त्रास, पण आता पसंती 
- माधवी चिंचोलीकर, अध्यक्ष, सुरेंद्रनगर ज्येष्ठ महिला विरंगुळा मंडळ

नोटाबंदी नावाच्या अचानक आलेल्या त्सुनामीमुळे सुरुवातीचे किमान दोन महिने सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्रास झाला. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष फटका बसला. घराची जबाबदारी असलेल्या गृहिणींना या निर्णयानंतर पैसे खर्च करताना बराच विचार करावा लागला. तर, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन घेताना बॅंकेसमोर असलेल्या लांबच लांब रांगेमुळे दिवसा तारे दिसले. मात्र, हा त्रास होणार असला तरी याचे परिणाम चांगले दिसणार या विश्‍वासातून लोकांनी स्वत:चे दैनंदिन व्यवहार केले. यासाठी आवश्‍यक ते बदल प्रत्येकाने आपापल्या परीने केल्याचे चित्र दिसून येत आहे. काळानुरूप ऑनलाइन व्यवहाराला ज्येष्ठ नागरिकांनी पसंती दिली असून गृहिणीदेखील आता विविध ॲप्सचा वापर करू लागल्या आहेत. 

गृहिणी, मोलकरणीही बॅंकेशी जुळल्या 
- रेणुका बोरोले, सीए, के. ॲण्ड डी. असोसिएट्‌स

नोटाबंदीनंतर कमी उत्पन्न असलेली कुटुंब बॅंकेशी जोडली गेली आहेत. हे ‘कॅशलेस’ किंवा ‘लेसकॅश’ अर्थव्यवस्थेच्या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल असून येणाऱ्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील. कोणताही नवा बदल स्वीकारताना अडचणी येतात. नोटाबंदीनंतरचा काही काळ नागरिकांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, यानिमित्ताने गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिलासुद्धा बॅंकेशी जोडल्या गेल्या. योग्य जनजागृती केल्यास बॅंकेद्वारे व्यवहार वाढतील. त्यातून ऑनलाइन क्षेत्राला निश्‍चितच चालना मिळेल आणि कर स्वरूपात गोळा होणाऱ्या महसुलात मोठी वाढ होईल. परिणामी पायाभूत प्रकल्पांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळू शकेल. निर्णयाचे फलित दिसण्यास आणखी काही काळ लागणार आहे. मात्र, ५० टक्के नागरिक सरकारच्या बाजूने अणून धाडसी निर्णय म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. 
 

वर्षभरात पाया तयार, फायदे पुढे होतीलच  
- सुरेंद्र दुरुगकर, सीए  आणि सचिव, आयसीएआय, नागपूर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पसरलेल्या वेगवेगळ्या स्वरूपातील भीतीमुळे सर्वांचाच कल पारदर्शक व्यवहारांकडे दिसून आला. या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला. सरकारने हिंमत दाखवून घेतलेल्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होण्यात मदत होणार आहे. या निमित्ताने वर्षभरात एक पाया तयार झाला आहे. याचा फायदा पुढे होईल. बेनामी व्यवहार उघड होणे असो वा काळा पैसा बाहेर पडणे असो नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेला प्रामाणिकतेची जोड मिळाली, हे नाकारता येणार नाही. कुठे काही लपविले तर सरकारी यंत्रणेची गाज तर आपल्यावर येणार नाही  ना, या भीतीतून लोक सरळमार्गाने व्यवहार करू लागले आहेत. ही स्थिती दुरगामी चांगल्या परिणामांसाठी अनुकूल आहे. 

‘कॉमन मॅन’ची फसवणूक, नैराश्‍य कायम  
- संजय अग्रवाल, सचिव, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

नोटाबंदीचा निर्णय एक साहसी आणि दुरगामी परिणाम करणारा निर्णय ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नोटाबंदीनंतरची वर्षभराची स्थिती पाहता या निर्णयामुळे ‘कॉमन मॅन’ची फसवणूक झाली आहे. नोटाबंदीचा प्रवास हा भ्रष्टाचाराला आळा-कॅशलेस अर्थव्यवस्था-लेस कॅश अर्थव्यवस्था असा झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील घटकांना जबरदस्त फटका बसला  आहे. तसेच जे लोक काळा पैशाची ओरड करतात. ते या पैशामुळे अर्थव्यवस्थेला बळकटीच मिळत असल्याचे नाकारू शकत नाही. तसेच, व्यवहारात सुरू असलेला संपूर्ण पैसा हा काळा नसतो. यामुळे काळा पैसा रोखण्यात सरकारला यश आले असा दावा करणे चुकीचा आहे. आज कुठल्याही उद्योगक्षेत्रात पाहिल्यास नोटाबंदीनंतर आलेले नैराश्‍य कायम आहे. 

नोटाबंदीचे वृत्तसंकलन - राजेश रामपूरकर, राजेश प्रायकर, केवल जीवनतारे, नितीन नायगावकर, योगेश बरवड, नीलेश डोये, अनिल कांबळे, निखिल भुते, देवनाथ गंडाटे, विजयकुमार राऊत, अतुल मांगे, नीलेश डाखोरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com