‘रोपे आपल्या द्वारी’ योजनेचा आज शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

१७९ रोपांची लागवड - ‘माय प्लॅंट’ ॲपवर करा नोंदणी 
नागपूर - वनविभाग लोकसहभागातून एक ते सात जुलै या कालावधीत राज्यात ‘वनमहोत्सवा’मध्ये चार कोटी वृक्षलागवड करणार आहे. जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी नागपूर वनविभागातर्फे उद्या, रविवार(ता. २५)पासून ३० जूनपर्यंत ‘रोपे आपल्या द्वारी’ ही योजना राबविण्यात येत आहे.  

१७९ रोपांची लागवड - ‘माय प्लॅंट’ ॲपवर करा नोंदणी 
नागपूर - वनविभाग लोकसहभागातून एक ते सात जुलै या कालावधीत राज्यात ‘वनमहोत्सवा’मध्ये चार कोटी वृक्षलागवड करणार आहे. जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी नागपूर वनविभागातर्फे उद्या, रविवार(ता. २५)पासून ३० जूनपर्यंत ‘रोपे आपल्या द्वारी’ ही योजना राबविण्यात येत आहे.  

वनविभागाच्या माध्यमातून तीन स्थायी स्टॉल सेमिनरी हिल्स नर्सरी, विमानतळावरील नर्सरी आणि अंबाझरी कार्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. पाच फिरते स्टॉलची सुरुवात लाकडगंज, रेशीमबाग, वाडी नाका, काटोल नाका आणि दिघोरी नाका येथे होत आहेत. हे फिरत्या वाहनावरील स्टॉल सकाळी नऊ ते संध्याकाळी ६ या वेळेत उघडे राहतील. नागरिकांना पाच रोपे व संस्थेला २५ रोपे अल्पदरात मिळणार आहेत. रोपांची किंमत सहा ते ४१ रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक संजीव गौर यांनी दिली. 

वनविभागाच्या माध्यमातून एक ते सात जुलै या कालावधीत वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांना रोपांचा पुरवठा करण्यासाठी वाहनाचा वापर करून रोपे लागवड करणाऱ्या नागरिकांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहेत. 
उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन म्हणाले, विभागाने रोपे लावण्याविषयीची माहिती अपलोड करण्यासाठी ‘माय प्लॅंट’ मोबाईल ॲप सुरू केला आहे. हे ॲप अँड्रॉइड मोबाईलवरून किती रोपटे लावली याची माहिती कळविल्यास विभाग त्याचीसुद्धा नोंद घेणार आहे. नागपूर विभागाला ८५ लाख ७० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ६६ लाख ८६ हजार वनविभाग, ९ लाख ६८ हजार रोपे ग्रामपंचायती तसेच इतर विभाग व संघटना मंडळ ९ लाख सहा हजार वृक्षांची लागवड करणार आहे. 

राज्यात ४ कोटी ६३ लाख खड्डे तयार 
वनविभागाच्या ऑनलाइन नोंदणीत शुक्रवारपर्यंत ४ कोटी ६३ लाख खड्डे खणण्यात आल्याची नोंदणी झालेली आहे. त्यात एकूण १७९ प्रजातींचे रोपे लागवड करण्याची योजना आहे. ५ कोटी ८३ लाख इतकी झाडे लावण्याचा प्रयत्न आहे. वनविभाग राज्यात २ कोटी २५ लाख रोपांची लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, ३ कोटी ३५ लाख वृक्षांची आखणी केली आहे. राज्यातील विभागात ३ कोटी २८ लाख खड्डे तयार करण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे सहभागी संस्थेतर्फे केले आहेत. वनसंरक्षक अशोक गिरिपुंजे, उपसंचालक मोहन ढेरे, विभागीय वनाधिकारी अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे.

Web Title: nagpur vidarbha repe aapalya dari scheme