पाण्याची उधळपट्टी... मुबलकतेमुळे वाढली बेफिकिरी

राजेश प्रायकर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुबलक पाणी मिळत असल्याने पाण्याच्या फवाऱ्यात उद्याचे संकट नागपूरकरांना दिसेनासे झाले आहे. 

नागपूर :  चार महिन्यांपूर्वी दिवसाआड पाण्याने तहान भागविणाऱ्या नागपूरकरांना बचतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. सध्या मुबलक पाण्यामुळे नागपूरकरांनी चारचाकी वाहन धुण्यासाठी बिनधास्तपणे पिण्याच्या पाण्याचा मारा सुरू केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी महापालिकेसह विविध सामाजिक संस्थांही सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पाण्याच्या बचतीचा जागर सुरू आहे. मात्र, मुबलकतेमुळे नागपूरकरांची बेफिकिरी चांगलीच वाढल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

उन्हाळ्यात महापालिकेला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागला होता. सुज्ञ नागरिकांनीही पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले होते. जलसाठेच कोरडे पडल्याने नागपूरकरांवर अभूतपूर्व पाणी संकट कोसळले होते. अगदी अलीकडे ऑगस्टपर्यंत नागपूरला पाणीपुरवठा करणारा तोतलाडोह येथील जलसाठा कोरडा पडला होता. त्यामुळे नागपूरकरांनीही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काटकसर सुरू केली होती. दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही नागपूरकरांनी शब्द न काढता दिवस काढले. तीन महिन्यांपूर्वीच्या या संकटाचा विसर नागपूरकरांना पडल्याचे शहराच्या विविध भागांत वाहने धुण्यांवरून दिसून येत आहे.

16 जुलैपासून पालिकेला शहरात दिवसाआड सुरू करण्यात आला होता. शहरासाठी पालिकेला दिवसाआड 650 एमएलडी पाणी मिळत होते. जवळपास दीड महिना ही स्थिती होती. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तोतलाडोह जलसाठा 0.01 टक्‍क्‍यांपासून 34.68 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला. सप्टेंबरअखेर हा साठा 99.99 टक्‍क्‍यांवर गेला अन्‌ महापालिकेने सुटकेचा श्‍वास सोडला. आज तोतलाडोह जलसाठ्यात 97.22 तर सद्यस्थितीत आता दररोज नागपूरकरांसाठी 650 एमएलडी पाणी सोडले जात आहे. 

दररोज मुबलक पाणी मिळत असले तरी जलतज्ज्ञ तसेच विविध सामाजिक संस्था, पालिकेकडूनही सोशल मीडियद्वारे पाणी बचतीचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. मात्र, मुबलक पाण्यामुळे नागपूरकर तीन महिन्यांपूर्वीचे संकट विसरलेच, परंतु पुढील चार महिन्यांनंतरच्या संकटाचे संकेत देणारे सोशल मीडियावरील संदेशांकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळत असल्याने पाण्याच्या फवाऱ्यात उद्याचे संकट नागपूरकरांना दिसेनासे झाले आहे. 

बचतही अन्‌ स्वच्छताही 
वाहन स्वच्छ असावे, यात काहीही गैर नाही. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्याऐवजी एखाद्या बादलीत पाणी घेऊन कापडाने वाहन स्वच्छ करणे शक्‍य आहे. अशा पद्धतीने अवघ्या दोन किंवा तीन बादल्यात वाहन धुता येईल. 

कार स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर आलाच. पाणी बचत करूनही वाहने धुणे शक्‍य आहे. नागरिकांनी स्वतःच पाणी बचत गांभीर्यानी घेतली तर वाहनही स्वच्छ होईल अन्‌ पाण्याची बचतही होईल. 
- श्‍वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, महापालिका. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, water, nmc, citizen