नागपूर पश्‍चिमचे सर्वच इच्छुक धास्तावलेले

राजेश चरपे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे राजकीय चित्रच बदलल्याने पश्‍चिम नागपूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी भांडणारे कॉंग्रेसचे नेते शांत आहेत. अनेकजण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने भाजपचा उमेदवारही बदलणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वचजण धास्तावले आहेत.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे राजकीय चित्रच बदलल्याने पश्‍चिम नागपूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी भांडणारे कॉंग्रेसचे नेते शांत आहेत. अनेकजण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने भाजपचा उमेदवारही बदलणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वचजण धास्तावले आहेत.
पश्‍चिम नागपूरवर अनेक वर्षे कॉंग्रेसचे राज्य होते. सुमतीताई सुकळीकर, नितीन गडकरी यांनी प्रयत्न करून बघितले. मात्र, ते यशस्वी ठरले नाहीत. 1990 मध्ये विनोद गुडधे-पाटील यांनी भाजपला या मतदारसंघाचे दरवाजे उघडे करून दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. दोनवेळा त्यांनी येथून विजय मिळविला. विशेष म्हणजे, रणजित देशमुख यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला त्यांनी पराभूत केले. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर फडणवीस दक्षिण-पश्‍चिममध्ये गेले. त्यांच्या जागी सुधाकर देशमुख येथे आले. त्यांना कॉंग्रेसच्या अनिस अहमद यांनी कडवी लढत दिली होती. अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने देशमुख विजयी झाले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत विकास ठाकरे यांना पराभूत करून त्यांनी कसर भरून काढली. सुमारे तीन दशकांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे मताधिक्‍य सातत्याने घटत चालले आहे. हा मतदारसंघ जिंकणे अवघड वाटत असल्याने यंदा कॉंग्रेसच्या दावेदारांची संख्या घटली आहे. गत निवडणुकीत राजेंद्र मुळक येथून लाढण्यास प्रचंड उत्सुक होते. विकास ठाकरे यांनी आधीपासूनच येथे दावा ठोकला होता. त्यामुळे शेवटच्याक्षणी मुळकांना कामठीत जावे लागले. लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांचाही उत्साह मावळला आहे. ठाकरे यांचा दावा कायम असला तरी त्यांच्या उमेदवारीला या मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. अंतर्गत भांडणामुळे येथे कॉंग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेकांची इच्छा असली तरी निवडून येण्याची शाश्‍वती नाही. परंपरागत मतांशिवाय सुमारे 30 हजारांची अतिरिक्त मते घेणाराच येथून जिंकू शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे. याशिवाय येथे कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे उमेदवारी देताना येथे जातीचे समीकरण बघावे लागणार आहे.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना भाजपने ऑफर दिल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोमात आहे. ठाकरे सातत्याने या वृत्तास खोडून काढत आहेत. "जे ऑफर दिल्याची चर्चा करत आहेत त्यांनाच विचारा' असे त्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यांचा प्रवेशाचाही मुहूर्त ठरला होता. असे असले तरी ते सध्या कॉंग्रेसमध्येच आहेत. आपण येथूनच लढणार असल्याचेही ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगली मैत्री आहे. हा धागा पकडून ते पश्‍चिमचे भाजपचे उमेदवार राहतील, असे काही नेते दाव्याने सांगत आहेत. असे झाल्यास देशमुख यांचा पत्ता कट होऊ शकतो. येथे कॉंग्रेसचे नरेंद्र जिचकार यांचे पोस्टर झळकू लागले आहेत. माजी नगरसेवक अरुण डवरेसुद्धा डोकावताना दिसत आहेत. मात्र, ठाकरे कॉंग्रेसमध्ये असेपर्यंत येथे दुसऱ्याला संधी मिळणे जवळपास अशक्‍यच आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur west vidhansabha constituency