नागपूर एरोस्पेस आणि एव्हिएशन हब होणार

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीमुळे नागपूरने एव्हिएशन आणि एरोस्पेस क्षेत्राचा पाया रोवला आहे. भविष्यात या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या येथे केंद्र सुरू करणार आहे. त्यामुळे नागपूर आता एरोस्पेस आणि एव्हिएशन हब म्हणून उदयास येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

सेझ-मिहान येथे टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीने बोईंग विमानांचे पंचवीस हजाराव्या फ्लोअर बिमच्या डिस्पॅच समारंभात ते बोलत होते. महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजय सिंग, बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते उपस्थित होते. गडकरी म्हणाले, मिहानमध्ये अन्य कंपन्या व टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीमुळे नागपूर आणि विदर्भातील तरुणांना एव्हिएशनसारख्या क्षेत्रात आपली कारकीर्द घडविण्यासाठी संधी उपलब्ध होत आहे. मिहानमधील टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीच्या प्लॉंटमध्ये शहरासह विदर्भातील युवकांना प्राधान्याने रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागपूर आता एज्युकेशन हब म्हणूनही जगाच्या नकाशावर येत आहे. यामुळे तरुणांमधील गुणवत्तेला योग्य न्याय मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. तसेच विविध क्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणीही वेगाने होत आहे. निर्यातक्षम लघुउद्योगांच्या वाढीवर आता प्राधान्याने भर देण्यात येत आहे. उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. उद्योगांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मिहानमध्येही उद्योगांसाठी विशेष सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
मिहानमध्ये एरोस्पेस क्षेत्रातील पहिला प्लॉंट टाटा एअरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीने सुरू केला आहे. येथील उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची असून त्याची निर्यात करण्यात येते. येथील प्लॉंटमधील तयार होणारे बोईंगसाठी लागणारे फ्लोअर बिम हे अत्यंत गुंतागुंतीचे व महत्त्वपूर्ण उपकरण आहे. या उत्पादनात उच्च प्रतीचा दर्जा राखण्यात येतो. आगामी काळात कंपनीच्या माध्यमातून विमान आणि हेलिकॅप्टर बांधणीसंदर्भातील तसेच सुटे भाग निर्मितीचा प्लॉंट सुरू करण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. टाटा एरोस्पेस ऍण्ड डिफेन्स कंपनीतर्फे बोईंग विमानांसाठी आवश्‍यक असणाऱ्या 25000 व्या फ्लोअर बिमचे डिस्पॅच होण्याचा क्षण नागपूरकरांसाठी व विशेषत्वाने तरुणांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचेही गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com