ठरलं...हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून; केवळ सात दिवसांचे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

 हे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुऱ्याने रंगणार असल्याचे बोलले जात आहे. 

नागपूर : तब्बल एक महिन्याच्या अस्थिरतेनंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकाली निघाला असून सरकारने विश्‍वासदर्शक प्रस्तावही जिंकला आहे. त्यामुळे आता सरकार कामाला लागली आहे. उद्या रविवारी (ता. 1) विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. हे अधिवेशन फक्त सात दिवसांचेच राहील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या अधिवेशनात चांगलाच कस लागणार आहे. मागील सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नऊ डिसेंबरपासून होणार होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेवरून महिनाभर गुऱ्हाळ चालले. राष्ट्रपती राजवटही लावण्यात आली. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा वाढल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु, अखेर सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतली. आज बहुमतही सिद्ध केले. यामुळे नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी यासंदर्भात बैठक घेत, तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सत्तास्थापनेला झालेल्या विलंबामुळे नियोजित 9 तारखेपासून अधिवेशन सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अधिवेशन आता 16 डिसेंबरपासून होणार आहे. अधिवेशन फक्त सात दिवसांचेच असणार असल्याचे सांगण्यात येते. 25 डिसेंबरपूर्वीच अधिवेशनाचे सूप वाजण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नव्या सरकारचे विदर्भातील हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे विरोधकांची किमान दोन आठवडे अधिवेशन चालविण्याची मागणी होण्याचा अंदाज आहे. विरोधकांना हातात कोलीत न देण्यासाठी सरकारकडून अधिवेशन दोन आठवड्यांचेही करण्याची शक्‍यता आहे. अद्याप तरी अधिवेशनाचा कालावधी स्पष्ट नसल्याचेही सूत्रांकडून समजते. 

विधिमंडळाचे अधिकारी येणार 
अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून कामाची पाहणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईतून विधिमंडळाचे अधिकारी येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून संपूर्ण आढावा घेण्यात येईल. त्यानंतर सचिवालयच येथे स्थानांतरित होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, winter assembly session from 16 december