ठरलं! शपथविधीच्या क्रमानुसार मंत्र्यांना कॉटेजचे वाटप

नीलेश डोये
शनिवार, 7 डिसेंबर 2019

विधिमंडळाचे कार्यवाह सचिव राजेंद्र भागवत रविवारी (ता.8) कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी या कॉटेजबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. 

नागपूर : उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी अद्याप खातेवाटप झाले नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून मंत्र्यांना कॉटेजही प्रस्तावित करण्यात आले आहेत. शपथविधीच्या क्रमानुसार हे कॉटेज वाटप करण्यात आले असल्याचे समजते. 

साधारणत: मंत्र्यांची ज्येष्ठता व खात्यानुसार कॉटेज वाटप करण्यात येते. परंतु, खातेवाटप झाले नसल्याने शपथविधीच्या क्रमानुसार ते वाटप करण्यात आले असून पहिल्यांदाच अशा प्रकारे कॉटेजचे वाटप झाल्याचे सांगण्यात येते. निवड झाली नसल्याने उपमुख्यमंत्र्यांचे निवास देवगिरी, विधानसभा उपाध्यक्ष व विधान परिषद विरोधी पक्ष नेत्यांचे कॉटेज रिक्त ठेवण्यात आले. तर माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निवास कॉटेज नं.23 मध्ये असणार आहे. 

नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. शिवसेनाप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. शपथविधीच्या वेळी सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी तर दोन कॉंग्रेसच्या आमदारांचा समावेश होता. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, तर कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारचे खातेवाटप झाले नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटप होणार असल्याचे संकेत आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. छगन भुजबळ, जयंत पाटील हे ज्येष्ठ सदस्य असून महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. उपमुख्यमंत्री पदही भूषविले आहे. खातेवाटप झाले नसल्याने शपथविधीच्या क्रमानुसार कॉटेज वाटप करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

असे आहे कॉटेज 
नाव---कॉटेज क्रमांक 
उद्‌धव ठाकरे---रामगिरी 
रिक्त---देवगिरी 
एकनाथ शिंदे---1 
सुभाष देसाई---2 
जयंत पाटील--3 
छगत भुजबळ---4 
बाळासाहेब थोरात---5 
नितीन राऊत---6 
रामराजे निंबाळकर (सभापती वि.प.)---18 
नाना पटोले (अध्यक्ष वि.स.)---17 
नीलम गोऱ्हे (उपसभापती वि.प.)---20 
रिक्त उपाध्यक्ष वि. स.---19 
रिक्त विरोधी पक्षनेता वि. प.---22 
देवेंद्र फडणवीस---23 

देवगिरी उपमुख्यमंत्र्यांसाठी 
राज्यात उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्मितीनंतर उपराजधानीत उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी या निवासस्थानाची निर्मिती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पद कुणालाच देण्यात आले नसल्याने प्रथम हे निवास रिक्त ठेवण्यात आले होते. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना या निवासाचे वाटप करण्यात आले होते. यावेळी सध्या उपमुख्यमंत्री पदावर कुणाचीही निवड झाली नाही. त्यामुळे ज्येष्ठ मंत्र्यांना याचे वाटप करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, देवगिरी हे उपमुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या पदावर कुणाचीही नियुक्त नसल्याने ते रिक्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, winter assembly session, minister cottage