नागपूर जिल्हा संघ प्रथमच विजेता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : रोहन गुरबानी व राशी लांबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नागपूर जिल्हा संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पुणे जिल्हा संघाचा 3-2 ने पराभव करून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे परभणी येथे सुरू असलेल्या राज्य वरिष्ठ गट आंतरजिल्हा (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकाविले. रोहन गुरबानीने पाऊण तास रंगलेल्या एकेरी लढतीत आर्य भिवपत्कीला तीन गेम्समध्ये 21-17, 15-21, 21-14 ने पराभव करून नागपूर संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुणे संघानेही लागोपाठ सामने जिंकून नागपूरवर 2-1 अशी आघाडी घेतली.

नागपूर : रोहन गुरबानी व राशी लांबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नागपूर जिल्हा संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पुणे जिल्हा संघाचा 3-2 ने पराभव करून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे परभणी येथे सुरू असलेल्या राज्य वरिष्ठ गट आंतरजिल्हा (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकाविले. रोहन गुरबानीने पाऊण तास रंगलेल्या एकेरी लढतीत आर्य भिवपत्कीला तीन गेम्समध्ये 21-17, 15-21, 21-14 ने पराभव करून नागपूर संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुणे संघानेही लागोपाठ सामने जिंकून नागपूरवर 2-1 अशी आघाडी घेतली. महिला एकेरीत नेहा पंडितने मुग्धा आग्रेला 21-12, 6-21, 21-14 ने आणि अभिषेक कुळकर्णी व रिषभ देशपांडेने गुरबानी व सौरभ केऱ्हाळकरला 21-7, 21-10 ने पराभूत केले. राशी लांबे व रितिका ठक्‍करने महिला दुहेरीचा सामना जिंकून लढतीत पुन्हा रंगत आणली. राशी-रितिका जोडीने नेहा व पूर्वा बर्वेला 21-13, 21-15 ने नमविले. निर्णायक ठरलेल्या मिश्र दुहेरी सामन्यात रोहन व राशीने अनिरुद्ध मयेकर व पूर्वा जोडीचा 9-21, 21-13, 21-11 ने पराभव करून नागपूरच्या विजेतेपदावर थाटात शिक्‍कामोर्तब केले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात झालेल्या चुरशीच्या उपांत्य लढतीत नागपूर संघाने द्वितीय मानांकित ठाणे जिल्हा संघाचा 3-2 ने पराभव केला. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात रोहनने प्रतीक रानडेला 21-11, 21-10 ने पराभूत करून नागपूरला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीत सायली राणेने मुग्धाला 21-13, 21-17 ने आणि पुरुष दुहेरीत अक्षय राऊत व कबीर कांजरकर या जोडीने हृदय देशमुख व सौरभ केऱ्हाळकरला 21-12, 21-11 नमवून ठाणे संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. नागपूरने त्यानंतर महिला दुहेरी व मिश्र दुहेरी लढती जिंकून अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केला. महिला दुहेरीत राशी व रितिका जोडीने सायली व सिमरन सिंघीला 22-20, 23-21 ने आणि मिश्र दुहेरीत राशी व रोहनने सिमरन व विघ्नेश देवळकरला 21-16, 21-18 ने पराभूत केले. उपांत्यपूर्व लढतीत नागपूर जिल्हा संघाने रायगड जिल्ह्याचे आव्हान 3-0 ने मोडीत काढले होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur won first time in state badminton