धक्‍कादायक... नेते मुक्त, इतर दोषी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नागपूर  : पतसंस्थेत असताना शाळेत असल्याचे दर्शवून भत्ता उचल केल्याप्रकरणी विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडून काही शिक्षकांना क्‍लिनचीट देण्यात आली. तर इतरांना दोषी ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागाच्या चौकशीत सर्व 45 शिक्षकांनी भत्ता उलच केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वांवर समान दोषारोपण असताना मोजक्‍याच शिक्षकांना क्‍लिनचीट कशी देण्यात आली, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. क्‍लिनचीट देण्यात आलेल्यांमध्ये कथित नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

नागपूर  : पतसंस्थेत असताना शाळेत असल्याचे दर्शवून भत्ता उचल केल्याप्रकरणी विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडून काही शिक्षकांना क्‍लिनचीट देण्यात आली. तर इतरांना दोषी ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागाच्या चौकशीत सर्व 45 शिक्षकांनी भत्ता उलच केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वांवर समान दोषारोपण असताना मोजक्‍याच शिक्षकांना क्‍लिनचीट कशी देण्यात आली, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. क्‍लिनचीट देण्यात आलेल्यांमध्ये कथित नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. विभागीय चौकशी अधिकाऱ्याच्या अहवालावर असंतुष्टी दर्शवित सीईओ संजय यादव यांनी सर्व फाईल फेरतपासणीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्याकडे पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 
पतसंस्थेत असताना शाळेत असल्याचे दर्शवून 45 शिक्षकांनी भत्त्याची उचल केली होती. पैशाची उचल करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार राजेंद्र सतई यांनी केली होती. यात अनेक शिक्षक संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे. याप्रकरणी 2015 मध्ये लोकायुक्तांनी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. राज्य माहिती आयोगाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. 2017 मध्ये या प्रकरणाच्या चौकशीत वेग आला. शिक्षण विभागाकडून सर्व 45 शिक्षकांची विभागीय चौकशी करता आवश्‍यक सर्व माहिती पाठविली. तत्पूर्वी शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत सर्व शिक्षक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक आयुक्त विवेक बोंद्रे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे जवळपास 33 शिक्षकांच्या फाइल्स आल्या. त्यांनी सर्व दोषी शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बाजू ऐकून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप लंगडे, लीलाधर ठाकरे, रेखा कडू, शदर भांडारकर, राजकुमार वैद्य, गुलाब उमाठे, गोपाल चरडे, गजानन, शिवाजी गौरखेडे, युवराज उमरेडकर, घनशाम पाटील, प्रवीण मेश्राम, रामू गोतमारे, पुंडलिक चंदनखेडे, छाया कोहळे, दिलीप मोहणे, सुरेश समर्थ, अनिल आष्टणकर, कश्‍यप सावरकर, सुरेश समर्थ, युवराज उमरेडकर आदींचा यात समावेश असल्याची माहिती आहे. तीस शिक्षकांची चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल सीईओंकडे पाठविल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोंद्रेच्या अहवालत काहींना क्‍लिन चिट देण्यात आली असून, इतरांना अंशत: दोषी ठरविण्यात आले आहे. सीईओ यादव यांनी या अहवालावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. संपूर्ण फाईल तपासणीसाठी शिक्षणाधिकारी वंजारी यांच्याकडे पाठविल्याची माहिती आहे. वंजारी यांच्या शिफारशीनंतर आवश्‍यक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur z p news