अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोरणांना सोडून युती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू घेऊन सत्ता मिळविली तर यवतमाळमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या मदतीने झेंड फडकविला आहे. आज, मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांनी विचारधारा धुळीस मिळविल्याचे चित्र दिसून आले आहे.

नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू घेऊन सत्ता मिळविली तर यवतमाळमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या मदतीने झेंड फडकविला आहे. आज, मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांनी विचारधारा धुळीस मिळविल्याचे चित्र दिसून आले आहे. येणाऱ्या काळात विचारांसाठी नव्हे तर फक्‍त सत्तेसाठी कोणासोबतही मांडीलामांडी लावून हे पक्ष बसतील, असे संकेतही आजच्या निवडणुकीने दिले आहे. 

वर्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळाले आहे. 52 पैकी भाजपला 31 जागा जिंकून सत्ताप्राप्त केली. अध्यक्षपदी नितीन मडावी हे निवडून आले आहेत. त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे. उपाध्यक्षपदी कांचन नांदूरकर निवडून आल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बहुमत होते. अध्यक्षपदी देवराव भोंगाळे निवडून आले. त्यांना 36 मते मिळाली तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहारे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक त्रिशंकू झाली होती. येथे कोणालाच बहुमत नव्हे. मात्र, सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा म्हणजेच 20 मिळाल्या होत्या. तर त्या पाठोपाठ कॉंग्रेसला 15 जागा जिंकता आल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने कॉंग्रेसवर मात करीत माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघासोबत हात मिळवणी केली. अध्यक्षपदी योगिता भांडेकर निवडून आल्या. 51 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भांडेकर यांना 33 मते मिळाली. तर, कॉंग्रेसच्या उमेदवाराला 18 मते मिळाली. आविसंचे अजय कंकडालवार हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये भाजप व राष्ट्रवादीची युती झाली. अध्यक्षपदी भाजपच्या उमा तायडे निवडून आल्या तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे विजयी झाल्या. भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 34 मते मिळाली तर कॉंग्रेसच्या उमेदवाराला 26 मते मिळाली. बुलडाणा जिल्हा परिषदेत 60 जागा आहेत. 

अमरावती व यवतमाळ येथे कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडून आले. अमरावतीमध्ये कॉंग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास शिवसेना यशस्वी झाली आहे. त्यांनी कॉंग्रेससोबत हात मिळवणी केली आहे. कॉंग्रेसचे नितीन गोंडाणे अध्यक्षपदी निवडून दिले आहे. त्यांना 32 मते मिळाली तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमणे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी भाजपचे शरद मोहोड व उपाध्यक्षपदासाठी प्रहारच्या योगिता जैस्वाल पराभूत झाल्या. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती घोषणा झाली असताना ऐनवेळी शिवसेनेला राष्ट्रवादीने धक्‍का दिला आणि भाजप, कॉंग्रेसच्या गोटात गेली. येथे कॉंग्रेसच्या माधुरी आडे अध्यक्षपदी निवडून आल्या तर उपाध्यक्षपदी भाजपचे श्‍याम जैस्वाल विजयी झालेत. राष्ट्रवादीला दोन सभापतिपद मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याचे मानल्या जाते. कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराला येथे 41 मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवाराला 21 मते मिळाली. राज्यमंत्री संजय राठोड यांना सत्तेपासून दूर ठेवण्यास येथे भाजप यशस्वी झाली आहे हे विशेष. 

वर्धा जिल्हा परिषद 
अध्यक्ष-नितीन मडावी (भाजप) 
उपाध्यक्ष-कांचन नांदूरकर (भाजप) 

चंद्रपूर जिल्हा परिषद 
अध्यक्ष-देवराव भोंगाळे (भाजप) 
उपाध्यक्ष-कृष्णा सहारे (भाजप) 

गडचिरोली जिल्हा परिषद 
अध्यक्ष-योगिता भांडेकर (भाजप) 
उपाध्यक्ष-अजय कंकडालवार (आविसं) 

बुलडणा जिल्हा परिषद 
अध्यक्ष-उमा तायडे (भाजप) 
उपाध्यक्ष-मंगला रायपुरे (राष्ट्रवादी) 

यवतमाळ जिल्हा परिषद 
अध्यक्ष-माधुरी आडे (कॉंग्रेस) 
उपाध्यक्ष-श्‍याम जैस्वाल (भाजप) 

अमरावती जिल्हा परिषद 
अध्यक्ष-नितीन गोंडाणे (कॉंग्रेस) 
उपाध्यक्ष-दत्ता ढोमणे (शिवसेना) 

Web Title: Nagpur zp president election