esakal | बापरे! आता स्टँम्प पेपरचाही काळाबाजार, १०० च्या पेपरची २२५ मध्ये विक्री

बोलून बातमी शोधा

stamp paper
बापरे! आता स्टँम्प पेपरचाही काळाबाजार, १०० च्या पेपरची २२५ मध्ये विक्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच स्टॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरसाठी नागपूरकरांना सव्वा दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. औषधे आणि धान्यांच्या चढ्या दराने जनता हैराण असताना लुटारूंच्या टोळ्या आता स्टॅम्प पेपरचाही काळाबाजार करीत आहेत.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

मिनी लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असल्याने स्टँम्प पेपरची मागणी फारच कामी झाली आहे. अत्यावश्यक काम असणाऱ्यांना हे पेपर मिळविण्यासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणाऱ्या काही मुद्रांक विक्रेत्यांनी खुलेआम चढ्यादराने विक्री सुरू केली आहे. ज्येष्ठ कामगार नेते व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी नुकताच या काळाबाजाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर असणाऱ्या सुनावणीत आपले म्हणने मांडण्यासाठी त्यांना शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यायचे होते. यांमुळे ते स्टँम्प पेपरच्या शोधात होते. त्यासाठी चालकाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाण्याची सूचना केली. चालकाने मोबाईलवरून शंभरचा स्टँम्प पेपर २०० ते २२० रुपयांना मिळत असल्याची माहिती दिली. गैरप्रकार मान्य नसल्याने ते स्वतः तिथे पोहोचले. काळाबाजार करणाऱ्याचा फोटो काढून घेतला. तो फोटो दाखवून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देताच एका महिला वेन्डरने १०० रुपयांतच स्टँम्प पेपर देण्याची तयारी दाखविली. पण, त्यासाठी किमान एक तास प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले. विचारणा केली असता स्टँम्प पेपर बाहेरून आणावा लागत असल्याने वेळ लागणार असल्याचे तिने सांगितले.

गरजू नागरिकांची अवाजवी लूट असणाऱ्या वेंडर्सवर कारवाई करण्यासह शासकीय दरानुसार स्टँम्प पेपर मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी उभारावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आहे.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

स्टँम्प पेपरचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. तक्रार करण्याची भाषा वापरली असता शंभर रुपयांमध्ये तो उपलब्ध करून देण्यात आला. पण, सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. ती थांबविण्यासाठी उपाययोजना व्हावी.
-मोहन शर्मा, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.