
Nagpur : स्मार्ट सिटीने लावले केवळ १२ स्मार्ट बूथ
नागपूर : उन्हाळ्यात पोलिसांना दिलासा देण्यासाठी १५० ठिकाणी स्मार्ट बूथ लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु निम्मा उन्हाळा निघून गेला. मात्र नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्पोरेशनला (स्मार्ट सिटी) केवळ १२ बूथ आतापर्यंत लावण्यात यश आले. त्यामुळे इतर चौकांमध्ये पोलिसांना अजूनही बूथची प्रतीक्षा आहे. पोलिसांना उन्हात वाहतूक नियंत्रण करावे लागत आहे.
पोलिसांसाठी स्मार्ट बूथ खरेदी करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीने यासाठी १५० ठिकाणी लावण्याचे निश्चित केले आहे. यापैकी केवळ १२ बूथ लावण्यात आले. परंतु अद्याप ते सुरूच केले नसल्याचेही दिसून येत आहे. शहरातील ११ पैकी चार वाहतूक झोनअंतर्गत अनेक चौकात बसवलेल्या १२ बूथच्या चाव्या वाहतूक पोलिसांना देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनीने निवडलेल्या बूथच्या जागांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिथे गरज नाही, तेथे बूथ उभारल्याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. एअर इंडिया चौकात एक बूथ आहे. विशेष म्हणजे येथे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कधीही पोलिस तैनात केले जात नाही. जीपीओ चौकात केवळ व्हीव्हीआयपी हालचालींदरम्यान पोलिस तैनात करण्यात येतात.
अत्याधुनिक यंत्रणेचा वापर
या बूथमध्ये पंखा, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, बसण्याची व्यवस्था, पिण्यायोग्य पाणी, माईक आणि बायोमेट्रिक यंत्र आहे. सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचे एक बूथ आहे. प्रत्येक किओस्कमध्ये सौर पॅनेल लावण्यात आले आहे. आतापर्यंतच्या बूथच्या तुलनेत स्मार्ट बूथ अत्याधुनिक आहे.
येथे हवे स्मार्ट बूथ
सिव्हिल लाईनमध्ये गरज नसलेल्या चौकांमध्ये स्मार्ट सिटीने बूथ लावले. मुळात हे स्मार्ट बूथ व्हेरायटी चौक, मुंजे चौक, छत्रपती चौक, पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक इत्यादी व्यस्त चौकांमध्ये लावण्याची गरज होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.