
Criminal Information : १२ हजारावर गुन्हेगारांची माहिती मिळणार एका क्लिकवर
नागपूर - महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी ‘ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ (एएमबीआयएस) वापरण्यास सुरुवात केली. ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून आता संपूर्ण भारतात वापरण्यात येणार आहे. शहर पोलिसांनीही या प्रणालीचा वापर करून गुन्हेगारांचा डाटा गोळा करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १२ हजारांहून अधिक गुन्हेगारांची खाती तयार करण्यात आली आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरात सुमारे १३ हजार गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. ज्या गुन्हेगारांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, बुबुळ इत्यादी एकत्रितपणे ऑनलाइन डेटाबेसमध्ये जमा करण्यात येत आहेत. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. घटनेनंतर गुन्हेगारांची हिस्ट्री काढण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या बोटांचे ठसे आणि इतर माहिती सिस्टममध्ये टाकून गुन्हेगाराचा ताबडतोब शोध घेतला जाऊ शकतो. केवळ तपासच नाही तर आरोपींना शिक्षा होण्यासाठीही ‘अॅम्बिस’ची मदत घेतली जाणार आहे. यातून गुन्हेगारांवरही वचक राहणार आहे.
आधुनिकतेला प्राधान्य
यापूर्वीही पोलिसांचा ‘फिंगरप्रिंट’ विभाग कार्यरत आहे. कोणत्याही घटनेवर सापडलेले बोटांचे ठसे हे ‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगारांच्या डेटाशी जुळायचे. मात्र आता आधुनिकीकरणाचा अवलंब करून गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे घेण्याची जुनी पद्धत बदलण्यात आली असून, आता केवळ बोटांचे ठसेच नव्हे तर हाताचे ठसे, चेहरा, डोळ्याचेही स्कॅनिंग केले जाते. त्याचे स्कॅनिंग करून डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवले जात आहे. गुन्हेगारांचा शोध घेताना हे सर्व उपयुक्त ठरणार आहे. लवकरच सर्व गुन्हेगारांचा डेटा गोळा केला जाईल.