esakal | २० टक्के रुग्णांना मनोविकाराचा विळखा! कोरोनामुळे वाढले ताण-तणाव
sakal

बोलून बातमी शोधा

mental issue

२० टक्के रुग्णांना मनोविकाराचा विळखा! कोरोनामुळे वाढले ताण-तणाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) रोजचं दैनंदिन आयुष्य अचानक थांबलं. घराबाहेर पडू नये हाच एक कार्यक्रम. मित्रांच्या चारचौघातील गप्पा थांबल्या. घरातील स्क्रीन टाइम वाढला आणि स्क्रीनवर कोरोनामुळे नकारात्मकता, चिंताजनक बातम्यांमुळे मनात कोरोना फोबिया तयार झाला. यातून नैराश्य (डिप्रेशन) वाढले. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर कोरोना आजार आपल्या प्रियजनांना होईल का, या भीतीने मनात घर केले. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिवालाच नाही तर मनाला घोर लावला असून मानसिक आजाराच्या (mental issue) रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (20 percent patients have mental issue due to corona)

हेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेचा झालेला उद्रेक यामुळे अनेकांच्या जवळचे व्यक्ती दगावले, कुटुंब कोरोनाबाधित झाले. यामुळे या पंधरा महिन्यांच्या काळात अनेकांची चिंता (अँक्झायटी) थोडी वाढली होती, तर काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत. नैराश्य हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले. एकूण २० टक्के लोकांना कोरोनामुळे मानसिक आरोग्य बिघडले. याचे दूरगामी परिणाम होण्याची चिंता मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला आता पाऊणेदोनशेवर मानसिक आजाराच्या रुग्णांना तपासण्यात येते.

मनोरुग्णालयातील वास्तव -

 • दरवर्षी एकट्या मनोरुग्णालयात २७०० नवीन रुग्णांची भर

 • २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत १३३६९ नवीन मानसिक रुग्ण

 • २०२० -२०२१ मधील १८ महिन्यांत ३ हजारांपेक्षा अधिक मनोरुग्ण

मोबाईल, टीव्ही मुलांसाठी घातक -

मैदानी खेळापासून मुले दुरावली. मोबाईलवरील ऑनलाइन शाळेपासून तर टीव्हीसमोरील मुलांचा वेळ वाढला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईलशी झालेली दोस्ती आता सुटत नाही. यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणाही वाढला. त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. इतरांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.

मुलांचा ताण दूर करण्यासाठी -

 • चांगले वातावरण मुलांसमवेत तयार करावे

 • पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे

 • ठराविक वेळेतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी

 • अभ्यास, खेळणे, जेवण यासाठीच्या वेळेचे नियोजन करून घ्यावे

 • मुलांसमवेत दररोज कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटीज पालकांनी करावी

 • मन शांत, आनंदी ठेवण्यासाठी

 • मेडिटेशन्स आणि माईंडफुलनेसचे व्यायाम करावे.

 • मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजनांशी संवाद वाढवावा

 • गरजूंना मदत केल्यास मन आनंदी होते, नैराश्य दूर होण्यास मदत होते.

''कोरोनाच्या संकटकाळात भीती, कोंडलेपण, असुरक्षितता, सामाजिक व आर्थिक परिणाम यामुळे अनेकजण मानसिक ताण-तणावाला सामोरे जात आहेत. नोकरी गेल्याने आर्थिक प्रश्न, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने मनावरील ताण वाढला आहे. आता हळूहळू कोरोनाच्या भीतीतून बाहेर निघत आहेत, मात्र नैराश्यातून बाहेर निघणे जड जात आहे. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी ‘क्वारंटाईन’ नंतर मानसिक आरोग्यावर बरेच विपरित परिमाण झाले आहेत. नैराश्यासोबतच निद्रानाश ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.''

-डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार रोग तज्ज्ञ नागपूर.

सकाळ माध्यम समुहाद्वारे जनजागृती -

सकाळ माध्यम समुहाने सातत्याने विविध उपक्रम राबवून कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या मानसिक स्वास्थाबद्दल जनजागृती केली आहे. याविषयी डॉक्टरांसह समाजातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सल्ले सातत्याने प्रकाशित करीत आरोग्याबाबत सकारात्मक वातावरनिर्मितीस हातभार लावला आहे.

loading image