esakal | खुशखबर! मिहानमध्ये रोजगाराच्या संधी, सहा महिन्यात ३ नव्या कंपन्यांची गुंतवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

मिहान

खुशखबर! मिहानमध्ये सहा महिन्यात ३ नव्या कंपन्यांची गुंतवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) प्रादुर्भावामुळे नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक थंडावलेली असताना मिहान प्रकल्पात (MIHAN Project Nagpur) तीन नवीन कंपन्यांनी जागा खरेदी केली आहे. त्यात आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीस, विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन आणि आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या वातावरणात ही दिलासा देणारी बातमी आहे. पंचताराकिंत हॉटेल आणि टाऊनशिपला जागा देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे मिहान प्रकल्पाने विकासाच्या दिशेने झेपावल्याचे बोलले जात आहे. (3 new companies will invest in mihan of nagpur)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

विदर्भाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मिहानकडे पाहिले जात होते. मात्र, त्याला हवी तशी गती प्रारंभी मिळाली नाही. अनेक सारथी बदलले तेव्हा थोड्या फार प्रमाणात विकासाच्या दिशेने झेपावत होता. दोन वर्षापासून या प्रकल्पात नवीन गुंतवणूक न आल्याने पुन्हा नकारात्मकता पसरलेली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिहानबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थाकीय संचालक दीपक कपूर यांना निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी तातडीने मिहान प्रकल्पास भेट दिली. गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यात आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीस साडे तेरा हेक्टर, विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन एक एकर आणि आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला ०.३० हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. या तिन्ही कंपन्यांनी आतापर्यंत १५ कोटीची जमीन खरेदी केली आहे. त्यात अंदाजे ५०० कोटीची गुंतवणूक आणि दीड हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. भविष्यात नवीन तीन कंपन्यांना आणि औद्योगिक वापरासाठी दीड एकर जागा देण्यात येणार आहे. एचसीएल कंपनीचा विस्तार करण्यात येणार असून पतंजली कंपनी डिसेंबर महिन्यात सुरू करणार आहे.

कोरोनानंतर मिहानमध्ये सकारात्मकता परत आणण्यासाठी आणि मिहान प्रकल्प संबंधित जी काही नकारात्मकता बदलण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मिहानमध्ये १५० एकर क्षेत्रामध्ये अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था कार्यरत आहे. या नवीन कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे विदर्भातील शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.
-दीपक कपूर, उपाध्यक्ष एमएडीसी
  • मिहानमधील कंपन्या - ४५

  • एकूण प्रत्यक्ष रोजगार - २१,०००

  • अप्रत्यक्ष रोजगार - ४०, ०००

नवीन येणारे प्रकल्प

  • पंचताराकिंत हॉटेल - ६.८ एकर जमीन

  • टाऊनशिप प्रकल्प - चार एकर जमीन

  • औद्योगिक वापरासाठी (लहान उद्योगांसाठी)- दीड एकर

loading image