Breast Cancer : धक्कादायक! ६९० महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

breast cancer

Breast Cancer : धक्कादायक! ६९० महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कॅन्सर विभागात (रेडिओथेरपी) २०२२ मध्ये २ हजार ३०० विविध कॅन्सरच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ६९० महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे मेडिकलच्या पथकाकडून गावभेट योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुगणालयांनी वाढत्या कॅन्सरवर नियंत्रण आणण्यासाठी अभियान सुरू केले आहे. महिलांमध्ये वाढत असलेला कॅन्सर रोखणे हा उद्देश ठेवून मेडिकलमधील तज्ज्ञांचे पथक गावागावात जाऊन महिलांची तपासणी करण्यावर भर देणार आहे. गावखेड्यातील महिलांच्या कॅन्सरचे स्क्रीनिंग करणे आवश्यक बनले आहे.

दर आठवड्यात ५० महिलांची तपासणी

मार्च २०२३ पासून मेडिकलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर मिशनला सुरवात झाली. याअंतर्गत महिलांच्या तपासणीसाठी दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर आठवड्याला येथे ५० महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत ४५० महिलांची तपासणी करण्यात आली आहे.

यापैकी १५ महिलांना कॅन्सरची जोखीम आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. शासनाच्या नव्या सूचनांप्रमाणे गावोगावी शिबिरे घेण्यात येणार आहेत. यात जनजागृती, स्तन तपासणी, संशयास्पद आढळल्यास वैद्यकीय तपासणी व मोफत उपचार करण्यात येतील. पुढील महिन्यापासून वैद्यकीय पथक गावोगावी जाणार आहे.

महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण

-२० ते ३० वयोगटात -२३० महिला

-३१ वर्षावरील -४६० महिला

राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे मेडिकलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर मिशन राबविण्यास सुरवात झाली आहे. विशेष बाह्यरुग्ण कक्ष तयार झाला असून लवकरच जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यासोबतच कॅन्सरची चाचणी करण्यात येणार आहे. कॅन्सरवर प्रतिबंध करणे ही सामाजिक जबाबदारी आहे.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :womenhealth