
Nagpur News : तेंदू संकलकांच्या खात्यात जमा होणार ७२ कोटी
नागपूर : तेंदूपाने संकलनातून जमा होणारे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदू पान संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून प्रथमच वाटप करण्यात येत आहे. यानुसार २०२२- २३ या वर्षासाठी ७२ कोटींचे स्वामित्व शुल्क वाटप केले जाणार आहे. तातडीने वाटप करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.
एका महिन्याच्या आत ही रक्कम आता तेंदू पान संकलन करणाऱ्या मजुरांच्या खात्यात जमा होईल. याशिवाय वन वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही फायर लाईनसह फायवॉचरचीही नेमणूक केली आहे. तेंदू हंगामात कंत्राटदारांकडून आगीच्या घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
वन परिक्षेत्र, विभाग, वनवृत्तानुसार अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित वन परिक्षेत्रातील संयुक्त वन समित्यांच्या बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. परिक्षेत्रस्तरावर कंट्रोल रूमही स्थापित करण्यात आल्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) डॉ. प्रवीण चव्हाण यांच्याशी राजेश रामपूरकर यांनी साधलेला संवाद.
राज्यातील तेंदू संकलन धोरणात काय बदल झाला
तेंदूपान संकलनाचे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदूपान संकलन करणाऱ्या मजुरांना देण्यात येणार आहे. तेंदू पाने संकलनाकरिता लिलाव प्रक्रियेतून मिळणाऱ्या स्वामित्व शुल्कातून विविध खर्च वजा करून त्या हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्साहन मजुरी ठरवण्यात येते. आता सन २०२२ च्या हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनातून जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजावट न करता संबंधित तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी दिली जात आहे.

पूर्वीच्या धोरणानुसार तेंदूपाने संकलनासाठी ई-लिलाव प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या स्वामित्व शुल्कातून तेंदूच्या लेखाशीर्षांतर्गत झालेला वेतन, मजुरी, कार्यालयीन खर्च इत्यादी प्रशासकीय खर्च अधिक १२ टक्के या प्रमाणे वजा केली जात होती. त्यानंतर हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्साहनार्थ मजुरी ठरवण्यात येत होती.
या प्रशासकीय प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागत होता. त्यामुळे तेंदू संकलकांना एक वर्ष उशिराने प्रोत्साहनात्मक मजुरी मिळत होती. आता ती अडचण दूर झाली असून तातडीने मोबदला दिला जात आहे. साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम वाटप होणार आहे.
तेंदू युनिटचा लिलाव कधी होणार
तेंदू पानांच्या संकलनासाठी ई लिलाव प्रक्रियेसाठी ची निविदा काढण्यात आलेली आहे. १४ तारखेला निविदा उघडण्यात येणार असून यंदा १०२ युनिटचा लिलाव करण्यात येणार आहे. तेंदूपान तोड करताना जंगलाला आगी लावू नयेत म्हणून कंत्राटदारांकडून हमी पत्रही भरून घेण्यात येत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रणात राहतील.
त्यासाठी परिक्षेत्रनिहाय गावकऱ्यांच्या बैठका, कार्यशाळा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदरांसोबत चर्चाही करण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी २७६ युनिटचे लिलाव करण्यात आले होते. त्यातील २५५ युनिटची विक्री झाली होती. त्यातून ७२ कोटीचा महसूल मिळाला आहे.
वन वणव्यासाठी उपाय योजना काय
एफएसआय विभागाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष देखरेखीसाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आगीच्या घटनास्थळी ताबडतोब उपस्थित राहण्यासाठी अचूक भौगोलिक निर्देशांक आणि वणव्यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांकानुसार रियाल टाइम नकाशे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना सामायिक केले जात आहेत.
आग लागल्यानंतर संबंधित क्षेत्रातील अधिकारी, वनरक्षकांना तातडीने त्यांच्या मोबाईलवर अलर्ट जात असल्याने आगीवर सहज नियंत्रण मिळवता येते. वणवा प्रतिबंधक उपाययोजना गतिमान केली आहे. क्षोत्रिय अधिकाऱ्यांसह पथके सक्रिय आहेत.