esakal | क्रीडा संकुलात ९०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर, जिल्हा नियोजन समितीतून करणार खर्च

बोलून बातमी शोधा

representative image
क्रीडा संकुलात ९०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर, जिल्हा नियोजन समितीतून करणार खर्च
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चार ते पाच हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या मानकापूर क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाकडून ९०० खाटांचे 'जम्बो कोविड केअर सेंटर' उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पाच महिन्यांसाठी हे सेंटर राहणार असून यावर ११६ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हे काम खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पाच महिन्यांसाठी ११६ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज सहा ते सात हजार लोक पॉझिटिव्ह येत असून शंभराच्या जवळपास रुग्ण दगावत आहेत. हा सरकारी आकडा असून प्रत्यक्षातील आकडा त्यापेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपचारासाठी शहरातील रुग्णालय कमी पडत आहे. महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच हजार खाटांचे कोविड केअर सेंटर तयार केले होते. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. आता कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यू संख्येनंतर प्रशासनाला जाग आली आहे. विशेष म्हणजे जम्बो कोविड सेंटर तयार करण्याची मागणी अनेक दिवसांची होती. अनेक लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी तशा सूचनाही केल्या होत्या. परंतु प्रशासनाने कानाडोळा केला. आता मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे ९०० खाटांचे कोविड सेंटर तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच महिन्यांसाठी हे सेंटर तयार करण्यात येणार आहे. यावर ११६ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. सेंटर तयार करण्याचे काम खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सरकारी काम असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाच महिन्यांकरिता ११६ कोटींचा खर्च जास्त असल्याचे बांधकाम विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येते. हा सर्व खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.