
Nagpur : वस्ती तशी चांगली; पण समस्यांनी गांजली!
अंबाझरी ले-आऊट : धरमपेठ झोनअंतर्गत येणारा अंबाझरी ले-आऊट परिसर हा खरंतर उपराजधानीतील पॉश वस्त्यांपैकी एक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील या भागात एक नव्हे, दोन नव्हे तर चार-चार नगरसेवक (सध्या माजी) आहेत.
मात्र, त्याउपरही या वस्तीत अनेक समस्या आहेत. मैदान आहे; परंतु त्यावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. ड्रेनेज लाईन चोक झाली आहे. रस्ते उंच आणि घरे ठेंगणी झाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावरचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. या गंभीर समस्येकडे कुणीच लक्ष देत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
नगरसेवक व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना येथील रहिवासी जयश्री गाडगे, आरती पाचघरे, उज्ज्वला ठाकरे, स्मिता वैद्य, कीर्ती भांगे व वैशाली गणोरकर म्हणाल्या, आमची वस्ती खूप चांगली आहे; मात्र आवश्यक सुविधाच मिळत नाही. ड्रेनेज लाइन नावालाच आहे. मात्र ती जागोजागी ब्लॉक झाली आहे. मुळात ड्रेनेज सिस्टीमच बरोबर नाही.
ड्रेनेज लाईन जमिनीत गेली असून, त्यावर गवत वाढले आहे. शिवाय रोड उंच असल्याने १०-१५ मिनिटे जोराचा पाऊस आला तरी पाणी लोकांच्या घरात शिरते. पावसाळ्यात चारही बाजूंनी पाणी वाहात येऊन रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी तुंबते. त्यामुळे घरासमोरील दुचाकी व चारचाकी वाहने पाण्यात बुडतात. या सर्व कटकटीमुळेच अनेक जण घरे विकून दुसरीकडे राहायला गेल्याचे त्यांनी सांगितले.
टॅक्स देऊनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत
ले-आऊटमध्ये कचऱ्याची गाडी नियमित येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी अनेक दिवसांपर्यंत कचरा तसाच पडून राहतो. कधी कधी कर्मचारी पैशाचीही मागणी करतात, असे काहींनी सांगितले. आम्ही मनपाला हजारो रुपये टॅक्सच्या रूपात देतो; मात्र त्या मोबदल्यात आम्हाला मनपाकडून मूलभूत सुविधासुद्धा मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
असामाजिक तत्त्वांचाही वावर
या मैदानावर असामाजिक तत्त्वांचाही मोठा वावर आहे. रात्रीच्या सुमारास तरुण मुले सिगारेट, दारू व गांजा पीत असतात. त्यांचा वस्तीतील नागरिकांना मोठा त्रास आहे. त्यांच्यामुळे महिलांमध्ये विशेषतः तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण असते. तक्रार करूनही याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.