
नागपूर : काटोल-नरखेडला वाऱ्यावर सोडणार नाही
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख जरी अडचणीत असले तरी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांच्या काटोल-नरखेड मतदारसंघासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही, असे सांगून येथील आरोग्य भवनासाठी एक कोटी रुपयांचा निधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंजूर केला.
नागपूर येथे अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सोमवारी आयोजित मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलत होते. काटोल व नरखेड तालुक्यातील आरोग्य संदर्भात विविध विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
काटोल तालुक्यातील भोरगड व झिल्पा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत ९० टक्के तयार झाली असून येथे पदभरती करुन दोन्ही केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली. यावर लवरकच तोडगा काढण्यात येईल असे टोपे यांनी सांगितले. काटोल व नरखेड येथे डायलेसिस व सिटी स्कॅन सेंटर उभारण्याची मागणी सुध्दा यावेळी सलील देशमुख यांनी केली. त्यावरसुध्दा लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.
काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर बोलताना टोपे यांनी सांगितले की, काटोल- नरखेड मतदारसंघातील आरोग्याबाबत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
इतकेच नाही तर काटोल आणि नरखेड येथे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसाठी कार्यालय उभारण्याकरिता एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच पुढील प्रक्रीया सुरू करण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा तसेच काटोल तालुक्यातील मेंटपांजरा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची बैठकीत मागणी करण्यात आली.
Web Title: Anil Deshmukh Trouble But Ncp Working Development Of Constituency Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..