न. प. शाळा ते ४ कंपन्यांचा मालक; 'केबीसी'मध्ये २५ लाख रुपये जिंकणाऱ्या स्वप्नील चव्हाण यांचा संघर्ष

ared positive story of a man who won  25 lakh in KBC
ared positive story of a man who won 25 lakh in KBC

नागपूर : 'नगर परिषदेची शाळा ते चार कंपन्यांचा मालक', हा आहे 'कौन बनेगा करोडपती'मध्ये २५ लाख रुपये जिंकणारे नरखेडचे युवा व्यावसायिक स्वप्नील चव्हाण यांचा संघर्ष. 'केबीसी'मध्ये मिळविलेल्या पुरस्कार राशीतील काही रक्कम लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांवर खर्च करून, त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

दोन दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चनद्वारा संचालित 'केबीसी'मध्ये पुरस्कार जिंकल्यानंतर ३७ वर्षीय स्वप्नील अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना कधी नव्हे इतके फोन आलेत. देशविदेशातील मित्र व नातेवाईकांनीही त्यांचे अभिनंदन केले. गरिबीत बालपण काढल्यामुळे त्यांच्यासाठी ही रक्कम फार मोठी असली तरी, त्यांना परिस्थितीचीही जाण आहे. त्यामुळेच त्यांनी पुरस्कारातील काही रक्कम गावातील गोरगरिब मुलांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या चार कंपन्यांचे मालक असलेले स्वप्नील यांचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण राहिला आहे. वडील टीव्ही मेकॅनिक आणि आई नगर परिषद शाळेत शिक्षिका. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. त्यावेळी जर्मनीत उच्च शिक्षणाची संधी असूनही केवळ पैशाअभावी ते जाऊ शकले नाहीत. मात्र त्यानंतर जिद्दीने इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी मोठे साम्राज्य उभे केले. इतकेच नव्हे तर व्यवसाय व अन्य कामाच्या निमित्ताने डझनभर देश फिरून विदेशवारीचे अपूर्ण स्वप्नही साकार केले. 

सुरुवातीला हैदराबादमधील विविध कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी मुंबईत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंसल्टन्सी नावाची कंपनी स्थापन केल्यानंतर तीन वर्षांनी नॅट इंजिनिअरिंग व नंतर एंटेक कंसल्टन्सी प्रा. लि. या आणखी एका कंपनीचे ते मालक झालेत. काही महिन्यांपूर्वी सर्वोदय या प्लास्टिक पुनप्रर्रक्रिया करणाऱ्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. दुर्दैवाने लॉकडाउन लागल्याने त्यांची चौथी कंपनी सुरू होऊ शकली नाही.

आग्रहामुळेच  शोमध्ये सहभागी होऊ शकलो

'केबीसी'मधील अनुभव शेअर करताना स्वप्नील म्हणाले, मी बच्चन यांचा लहानपणापासूनच चाहता आहे. त्यामुळे त्यांना जवळून भेटण्याची मनापासून इच्छा होती. सुदैवाने 'केबीसी'च्या निमित्ताने हा योग जुळून आला. खरं तर परिवाराच्या आग्रहामुळेच मी या शोमध्ये सहभागी होऊ शकलो. बिग बी ची भेट माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता, असे सांगून, त्यांनी माझा संघर्षमय प्रवास व सामान्य ज्ञानाची स्तुती केल्याचे ते म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार

केबीसी'मध्ये २५ लाख व 5 लाखांची शिष्यवृत्ती जिंकून नरखेड नगरीला नावलौकिक मिळवून देणारे स्वप्नील चव्हाण यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. मलबार हिल (मुंबई) येथील ज्ञानेश्वरी बंगल्यात आयोजित छोटेखानी समारंभात गृहमंत्र्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष नरेश अरसडे, पंचायत समितीचे उपसभापती वैभव दळवी, माजी सदस्य सतीश रेवतकर, येनीकोनीचे सरपंच मनीष फुके उपस्थित होते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com