नातेवाईकाच्या घरी खड्ड्यात लपवून ठेवली कोट्यवधींची रक्कम, झाला भंडाफोड

Billions of rupees were hidden in a relatives house Police arrested
Billions of rupees were hidden in a relatives house Police arrested

नागपूर : शेअर ट्रेड्रिंग आणि रियल इस्टेटमध्ये मल्टिलेवल मार्केटिंगचा (एमएलएम) फंडा सांगून देशभरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विजय गुरनुले टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरनुले याने गुंतवणुकदारांकडून लुबाडलेले लाखो रुपये अमरावतीमधील नातेवाईक महिलेच्या घरात खड्ड्यांमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी तीन खड्ड्यांतून पैशाचे बॉक्स काढून ५६ लाख रुपये जप्त केले, अशी माहिती डीसीपी नुरूल हसन यांनी पत्रपरिदेत दिली.

मेट्रो व्हिजन बिल्डकॉम कंपनीचा संचालक विजय रामदास गुरनुले (वय ३९, रा. महाजनवाडी, हिंगणा) याच्यासह देवेंद्र भीमराव गजभिये (वय ३४, रा. तोरगाव खुर्द ता.ब्रह्मपुरी) पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली. ज्ञानेश्वर बावणे, जीवनदास आनंदराव दंडारे, रमेश सूरजलाल बिसेन, अतुल युवराज मेश्राम, अविनाश महादेवराव महाडोले, राजू नागोराव मोहुर्ले, श्रीकांत केशव निकुरे अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत.

विजय गुरनुले आणि देवेंद्र गजभीये हे दोघे या स्कॅमचे मास्टरमाईंड असून या दोघांनी २०१५ मध्ये मेट्रोव्हिजन बिल्डकॉन नावाची कंपनी स्थापन केली. कंपनीतील योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखविले. व्यवसाय वाढत गेल्यानंतर रिअल ट्रेड आणि मेट्रो क्वॉइन या दोन कंपन्या २०२० साली सुरू केल्या. सुरुवातीला भूखंड विक्रीचा व्यवसाय केला. नंतर रिअल ट्रेडच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीतील रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात येईल. त्याबदल्यात चांगला नफा देण्याचे प्रलोभन त्याने दिले.
 
हेही वाचा - २६ वर्षांपूर्वीचे अधिवेशन : भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीचा आवाज आणि ११४ गोवारी बांधवांचा जीव गेला
 

सुरुवातीला गुरनुले व गजभिये या दोघांनी नियमितपणे गुंतवणूकदरांना मोबदला व व्याज दिले. गुंतवणूकदारांचा दोघांवरील विश्वास वाढला. त्याच बळावर विजय गुरनुले याने देशभरात मार्केटिंगचे जाळे पसरवले. या कंपनीचे आतापर्यंत २५ हजार ४०० गुंतवणूकदार झाले असून दोन लाख ५० हजार आयडी तयार झाल्या आहेत. गुंतवणुकदाराला प्रत्येक आयडीचे तीन हजार रुपये प्रमाणे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या फसवणुकीचा आकडा १०० कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ७५५९२९४०७६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करावी,असे आवाहन अतिरिक्त पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी केले.

महिन्यात ‘लकी ड्रॉ’

विजय गुरनुले हा नागपुरातील थ्री स्टार हॉटेलमध्ये महिन्यातून एकदा लकी ड्रॉ उघडत होता. त्यामध्ये जास्त आयडी काढून गुंतवणूक करणाऱ्यांना कार, बाईक, कम्प्युटर,लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि महागड्या वस्तू भेट देत होता. त्यामुळे गुंतवणुकदार आपल्या नातेवाइकांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडून लकी ड्रॉमध्ये भाग घेत होता.

केवळ दोनच राज्य सोडली

विजय गुरनुले आणि देवेंद्र गजभिये यांची मल्टी लेवल मार्केटिंगचा फंडा एवढा गाजला की भारतातील केवळ दोनच राज्य या स्कॅममधून सुटली. दादरा नगर हवेली आणि दीव दमन ही राज्य वगळल्यास गुरनुलेने सर्वच राज्यात फसवणुकीचे जाळे पेरले होते. सर्वाधिक फसगत झालेल्यांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, जम्मू काश्‍मीर, चंदीगड आणि आसाम राज्याचा क्रमांक लागतो. १ लाख ४६ हजार २७६ आयडीसह महाराष्ट्र राज्य टॉपवर आहे. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com