esakal | नागपुरात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव, ५०० पेक्षा अधिक कोंबड्यांची विल्हेवाट

बोलून बातमी शोधा

bird flu outbreak in nagpur

आता एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

नागपुरात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव, ५०० पेक्षा अधिक कोंबड्यांची विल्हेवाट
sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असतानाच नागपूर जिल्ह्यातही आता शिरकाव झाला आहे. बुटीबोरी तालुक्यातील डोंगरगाव जवळील वारंगा येथे मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे आता एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा

गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी देशात बर्ड फ्लूने शिरकाव केला. अनेक राज्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत झाल्या. त्यामुळे सर्वत्रच खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली होती. असे असतानाच आता नागपूर जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कोंढाळी आणि कळमेश्वर येथील पक्ष्यांचे अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनात आले नव्हते. मात्र, भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडून आलेल्या अहवालात वारंगा येथील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृत कोंबड्यांच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास ५०० पेक्षा अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारण्यात आल्या असल्याची माहिती आहे. तसेच त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. 

हेही वाचा - राज्यात मोठ्या भावाला रोखण्यासाठी काँग्रेसचे पटोले अस्र? राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा 

खवय्ये झाले सतर्क -
राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यापासून सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार पशुविभागाकडून सर्वत्र सूचनाही दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी दोन तालुक्यात काही पक्षी मृत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निःश्वास टाकला होता. आता वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळील शिवारात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. खवय्ये अधिकच सतर्क झालेले आहेत.