Nagpur : भाजप ग्रामीणमधील पडझड रोखणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP
भाजप ग्रामीणमधील पडझड रोखणार

भाजप ग्रामीणमधील पडझड रोखणार

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात मोठी पडझड झाल्याने विधान परिषदेसाठी ग्रामीण भागातून उमेदवार देण्याचा निर्णय भाजप घेण्यात असल्याचे समजते. त्यामुळे वीरेंद्र कुकरेजा, संजय भेंडे या शहरातील इच्छुक उमेदवारांची नावे मागे पडली आहेत.

गिरीश व्यास यांचा कार्यकाळ संपत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर एक उमेदवार विधान परिषदेवर पाठवायचा आहे. याकरिता निवडणूक घोषित झाली आहे. संख्याबळ अधिक असल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू असलेले नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांचे नाव याकरिता आघाडीवर होते. त्यांनाही तसे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. मतदारांची यादी गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आता मात्र कामठीचे माजी आमदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शर्यतीत आले आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये भाजपचे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात पाच आमदार होते. मात्र २०१९झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काटोल, रामटेक आणि उमरेड येथील भाजपचे आमदार पराभूत झाले. बावनकुळे यांना तिकीट नाकारल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर झालेल्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप पराभूत झाली. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसला आहे.

ग्रामीण भागातील ओबीसी मतदार भाजपपासून लांब जात असल्याचे पोटनिवडणुकीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे भाजप ओबीसी कार्ड खेळणार असल्याची शक्यता वर्तविला जात होती. त्यामुळे बावनकुळे यांच्या नाव प्रथम क्रमांकावर आले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि महापालिकेतील सत्तपक्षनेते अविनाश ठाकरे यांचेही नाव ओबीसी उमेदवार म्हणून समोर रेटल्या जात आहे. मात्र यात सर्वाधिक प्रबळ उमेदवार म्हणून बावनकुळे यांच्याकडे बघितले जात आहे.

ठाकरेंचा होकार, भोयरांचा नकार

शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अविनाश ठाकरे यांचे नाव समोर केले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे कळते. तेली,कुणबी आणि माळी या ओबीसी समाजाची जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे. त्यांच्या भेटीत भाजपच्या जवळचे आणि लांबचे ओबीसी कोण यावर चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व स्वयंसेवक रवींद्र भोयर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असल्याचे समजते. मात्र भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास नकार दिला.

loading image
go to top