esakal | उपराजधानीच्या राहणीमान सुलभता मानांकनाला कलंक
sakal

बोलून बातमी शोधा

उपराजधानीच्या राहणीमान सुलभता मानांकनाला कलंक

कामठी रोडवरील काही नागरिकांनी घर खरेदी केल्याचा पश्चाताप होत असल्याचे नमुद केले.

उपराजधानीच्या राहणीमान सुलभता मानांकनाला कलंक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: गुरुवारी (ता.८) नऊ तासांत झालेल्या १०० मिलिमीटर पावसाने नागरिकांच्या स्वप्नातील शहराला हादरा बसला. कामठी रोडवरील काही नागरिकांनी घर खरेदी केल्याचा पश्चाताप होत असल्याचे नमुद केले. त्यामुळे गेल्या मार्चमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्यावतीने शहराला मिळालेल्या राहणीमान सुलभता मानाकंनालाच कलंक लागल्याचे अधोरेखित झाले.

हेही वाचा: महामंडळाच्या बसगाड्यांना लागली गळती! अडचणींमुळे प्रवासी त्रस्त

राहणीमान सुलभता मानाकंनात देशभरातील १११ शहरांच्या निकालात नागपूरने ३१ वरून २५ व्या क्रमांकावर मजल मारली होती. अर्थात शहराच्या राहणीमान सुलभतेत सुधारणा झाली. परंतु गुरुवारी झालेल्या पावसाने शहराची दाणादाण उडविली. कामठी रोडवरील हुडको कॉलनीतील रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी जमा झाले. नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. हीच स्थिती सुरेंद्रगढ, स्वावलंबीनगर, जुना सुभेदारमध्येही होती. जुना सुभेदार ले-आऊटमध्ये सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.

हेही वाचा: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

हुडको कॉलनीतील नागरिकांनी परिसरात घर विकत घेतल्याने पश्चाताप व्यक्त केला. दिवसभर घरात दिवाण, सोफ्यावर बसून राहावे लागल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्याचवेळी जुना सुभेदार येथील नागरिकांनी घरातील घाण पाणी बादल्यात घेऊन हनुमाननगर झोन कार्यालय गाठले होते. शहरातील हिवरीनगर, नंदनवन या भागातही हीच स्थिती बघता अनेक नागरिकांनी हीच का स्मार्ट सिटी? असा खोचक सवाल उपस्थित केला. महापालिकेने नियोजन केले नसल्याने सुरेंद्रगढ परिसरातील घरांत पाणी शिरल्याचे जनहितचे अभिजित झा यांनी सांगितले.

हेही वाचा: घनकचरा व्यवस्थापनात नागपूर स्मार्ट सिटीला ‘फाईव्ह स्टार’ मानांकन

पाणी तुंबत असल्याचा मानांकनावर परिणाम

केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने ‘नागरिकांचा प्रतिसाद' या श्रेणीत नागरिकांची मतेही जाणून घेतली होती. यात अनेक नागरिकांनी रोजगारनिर्मितीच्या अभावासोबत शहरात पाणी तुंबत असल्याचे नमुद करीत अत्यल्प गुण दिले होते. त्यामुळेही शहराला मानांकनात २५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा: नागपूर ते बुटीबोरी हा रस्ता सहापदरी करणार

२००९ मध्ये हुडको कॉलनी परिसरात घर खरेदी केले. गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होते. माझ्या घरात अडीच फूट पाणी होते. येथे घर घेतल्याचा मोठा पश्चाताप होत आहे. नगरसेवकही लक्ष देत नाहीत. या परिसरात पाचशे कुटुंब राहतात. पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी त्यांच्या धान्य व इतर साहित्याचे नुकसान होते.

-किशोरलाल गियानी, ज्येष्ठ नागरिक, हुडको कॉलनी.

loading image