उपराजधानीत आरोग्याचं नवं मॉडेल तयार करण्यासाठी बुस्टर डोसची गरज; रुग्णालय आणि प्रशासनात समन्वय महत्वाचा 

Coordination between hospitals and NMC required for health model of Nagpur
Coordination between hospitals and NMC required for health model of Nagpur

नागपूर ः उपराजधानीची "मेडिकल हब'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील खासगी रुग्णालयांत ‘फाईव्ह स्टार’ आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, ६० वर्षांत महापालिकेच्या आरोग्य विभागाला संसर्ग रोगावरील उपचाराची आणि नियंत्रणाची कधी जाणीवच झालीच नाही. ती जाणीव कोरोना विषाणूने करून दिली. मेडिकल आणि मेयोच्या भरवशावर आरोग्याचा डोलारा सांभाळला जात आहे. 

१२ वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृष्टी दाखवत शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात दोन अद्ययावत अशी रुग्णालये उभारण्याचा विषय अजेंड्यावर घेतला. मात्र, अंमलबजावणी झालीच नाही. हातात कोणतेही शस्त्र न घेता मेयो, मेडिकलच्या बळावर कोरोनाशी लढण्यात आले. तथापि, कोरोनामुळे पायाभूत सोयी उभारण्यात महापालिकेला यश आले आहे. आता महापालिकेच्या रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळासह अत्याधुनिक यंत्रसामग्री, व्हेंटिलेटरची गरज आहे. नवीन वर्षात उपराजधानीतील आरोग्य संस्था असलेल्या मेडिकल, मेयो, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून आरोग्याचे नवे मॉडेल तयार करण्यासाठी एका बुस्टर डोसची गरज आहे. 

महापालिकेचा आरोग्य विभाग आतापर्यंत हेल्थपोस्ट अन्‌ "डिस्पेन्सरी'मध्ये बाह्यरुग्ण विभागांत पाच-पंचवीस रुग्णांची तपासणी करून शहराचे आरोग्य सांभाळत असल्याचा देखावा करीत उभा होता. मलेरियाची साथ असो, बर्ड फ्लू असो की, स्वाइन फ्लूचा भडका. शहरातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी कधीच पालिकेच्या आरोग्य विभागाने कधी स्वीकारलीच नाही. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महापालिकेच्या रुग्णालयातील खाटांची एकूण बेरीज १३१ होती. ६० वर्षांत एकही खाट वाढविण्याचा प्रयत्न पालिकेतील आरोग्य सेवा सांभाळणाऱ्यांनी केली नाही. 

दरवर्षी आरोग्याच्या अंदाजपत्रकात वाढ होते. कोरोनाच्या संक्रमणाने मात्र यावर्षी महापालिकेला आरोग्य सेवेचे महत्व पटवून देण्यात आयुक्त तुकाराम मुंढे पास झाले. त्यांच्या इच्छाशक्तीतून आरोग्य यंत्रणेचे वाजलेले बारा सुधारण्याचे काम झाले. १३१ खाटांवरून खाटांची संख्या ४६० झाली. महापालिकेने सेकंडरी केअर रुग्णालये उभारण्याची गरज असून मेडिसिन, सर्जरी, बालरोग असो की, विकृतीशास्त्र, बधिरीकरणशास्त्र विशेषज्ञांची नेमणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अत्याधुनिक यंत्रसामग्रीची गरज 

महापालिकेच्या एकाही रुग्णालयात अद्ययावत असे एक्‍स-रे मशीन नाही, सोनोग्राफीची सोय होती, ती बंद पडली आहे. सीटी स्कॅन तर नाहीच नाही. एमआरआय यंत्राचा तर विचारच करणे शक्‍य नाही, व्हेंटिलेटरचा विचारच न केलेला बरा, अशा समस्यांच्या विळख्यात पालिकेची आरोग्यसेवा सापडली आहे. यातून संसर्ग आजारांवर नियंत्रणाचा आणि उपचाराचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर केला आहे. आता खऱ्या अर्थाने शहरी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. 

नागपूरसाठी नवीन वर्षांत काय महत्त्वाचे? 

- ५० हजार लोकांमागे एक शहरी आरोग्य केंद्र 
- शहरात ६० शहरी आरोग्य केंद्रांची गरज 
- प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोनासह इतरही लसीकरणाची सोय 
- महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर भरीव तरतूद 
- एका शहरी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरसह १० कर्मचारी 
- २४ तास शहरी आरोग्य केंद्र सुरू 
- पूर्णवेळ मेडिकल ऑफिसर 
- आरोग्य केंद्रात स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आरोग्य समिती 

शहरात प्राथमिक, सेकंडरी रुग्णसेवेची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. शहरात संसर्गरोगासह इतरही आरोग्य सेवा सांभाळण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. मात्र ६० वर्षांत महापालिकेने शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरपणे घेतला नाही. महापालिकेने शहरी आरोग्य केंद्रांची सक्षमीकरण करावे.पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य नागपुरात विभागीय स्तरावरील रुग्णालये उभारावी. येथे व्हेंटिलेटरसह शस्त्रक्रियांची सोय असावी. शहरातील खासगी वैद्यकतज्ञांना मानसेवी नियुक्त करावे. यामुळे शहरात कोरोनासारख्या संसर्गरोगाचा सामना करणे सहज शक्य होईल. 
-डॉ. संजय देशपांडे, माजी अध्यक्ष, 
इंडियन मेडिकल असोशिएशन, नागपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com