
Crime News : धक्कादायक! महिला ऑटोचालकास शिविगाळ करत मारहाण; गुन्हा दाखल
नागपूर : आमच्या जागेवर ऑटो उभा केला म्हणून दोन ऑटोचालकांनी एका महिला ऑटोचालकाला मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना इंदोरा चौकात १० मे रोजी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल उर्फ बंटी मधूकर मेश्राम (वय ४०, रा. इंदोरा ट्राफिक ऑफिसमागे) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोचालक महिला गेल्या २६ वर्षांपासून ऑटो चालवितात. त्या इंदोरा चौक ते सीताबर्डी यादरम्यान सवारी घेतात.
१० मे रोजी त्या नियमितपणे टेकानाका येथून दोन सवारी घेऊन इंदोरा चौकात आल्या. यावेळी तिथे ऑटोचालक (एमएच४९, ई- ९१३) कुणाल मेश्राम आणि दिनेश येरपुडे (एमएच४९, ई-३०२३) हे दोघेही उभे होते. त्यांना एका सवारीची गरज असल्याने त्यांनी तिथे ऑटो उभा केला. यावेळी दोघांनी महिलेला त्यांच्याजवळ येऊन धमकावित ‘तू इथे ऑटो का उभा केलास तुझा बापाची जागा आहे का’? म्हणत शिविगाळ करू लागले.
यावेळी महिला ऑटोबाहेर येताच, त्यांनी अश्लिल शिविगाळ करीत जीवे मारण्याचीही धमकी दिली. तसेच, हात ओढून नाकावर बुक्क्यांनी मारहान केली. त्यामुळे त्या जखमी झाल्यात. हा प्रकार लक्षात येताच, इतरांनी धाव घेतल्याने दोघेही तिथून निघून गेलेत.
त्यावरुन पोलिसांना ऑटो चालक महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसा उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी विविध कलमासह गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.