
अख्ख्या कुटुंबाने घातला दालमिल व्यावसायिकास गंडा
नागपूर : विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत अधिक नफा देण्याच्या नावावर अख्ख्या कुटुंबाने वर्धमाननगर येथील दालमिल व्यावसायिकाची ४५ लाखांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. जगदीश सीताराम करवा (वय ४७), संगीता जगदीश करवा (वय ४२, रा. ३०२ शांतीकुल अपार्टमेंट, वर्धमाननगर), हेमंत सीताराम करवा (वय ४२, रा. हिवरी नगर), राजेश सीताराम करवा (वय ५२, गुरूकृपा अपार्टमेंट, वर्धमाननगर) अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे लेआउट येथे राहणारे दालमिल व्यावसायिक अशोक नागरमल अग्रवाल (वय ६५) यांचा मित्र, जगदीश करवा यांच्या वर्धमाननगर येथील शांतीकुल अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे.
ते नेहमी त्याच्याकडे जात असल्याने त्यांची जगदीश यांच्याशी ओळख झाली. त्यातून १ ऑक्टोबर २०२० साली जगदीशने त्यांना विविध कंपन्यात पैसा गुंतविण्याचा सल्ला दिला. याशिवाय त्यांना किर्ती ऑटो सेल नागपूर, सी.एम. इन्फ्रा प्रोजेक्ट आणि विनोद प्लास्टिक कंपनीमध्ये पैस गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असेही सांगितले.
त्यानुसार १ नोव्हेंबर २०२० या एका महिन्यादरम्यान अगरवाल यांनी ४५ लाखाची गुंतवणूक केली. विशेष म्हणजे हे करीत असताना जगदीशने त्याचा भाऊ हेमंत करवा आणि राजेश करवा यांच्यामार्फतही पैसे गुंतविले. याशिवाय पत्नीच्या मदतीनेही अगरवाल यांच्याकडून गुंतवणुक करण्यासाठी पैसे घेतले. यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र आणि धनादेशही दिले. मात्र, काही दिवस नफा मिळाल्यावर तो मिळणे बंद झाल्याने त्यांनी याबाबत जगदीश करवा यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.
प्रतिज्ञापत्र आणि दिले धनादेश
पैशासाठी अगरवाल यांच्याकडून वारंवार तगादा लावण्याने जगदीश करवा यांनी अगरवाल यांना प्रतिज्ञापत्र आणि धनादेश दिले. मात्र, ते धनादेश बॅंकेत टाकले असता, खात्यात रक्कम नसल्याने वटलेच नाही.
अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता
जगदीश, त्याची पत्नी आणि दोन भाऊ हे चौघेही कंपनीत पैसा गुंतवून त्यात दुप्पट नफा मिळेल असे आमिष देत होते. त्यातून अगरवाल यांची फसवणूक झाली. मात्र, त्यांनी अशाचप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज नंदनवन पोलिसांनी लावला आहे. त्यानुसार पोलिस तपास करीत आहेत.
Web Title: Crime News Family Fraud With Businessmen Fraud 45 Lakh Investment Grate Return Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..