
एचआरसीटी स्कोअर २५, पण दानिशने १२ दिवसांत केली कोरोनावर मात
नागपूर : सद्भावनानगर (नंदनवन) येथील दानिश शेखला काही दिवसांपूर्वी कोरोनाची प्राथमिक लक्षणे (corona symptoms) दिसत होती. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी (RTPCR testing) केली. एचआरसिटी (HRCT) केले. मात्र, तरीही निदान लागले नाही. तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि चालता फिरता दानिश अचानक बेडवर आला. अखेर तिसऱ्या चाचणीत रिपोर्ट (corona test report) पॉझिटिव्ह आला. तिसऱ्यांदा एचआरसीटी केल्यानंतर स्कोअर (HRCT score) २५ आला. मृत्यूच्या दाढेत गेलेला दानिश अजिबात घाबरला नाही. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न व उपचार करून त्याला या आजारातून सुखरूप बाहेर काढले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मिळविलेला विजय दानिशसाठी एकप्रकारे पुनर्जन्माचा अनुभव होता. (danish sheikh from nagpur overcame corona even hrct score is 25)
३० वर्षीय दानिश पत्रकार असून आधी एका वृत्तपत्रामध्ये काम करायचा. सध्या तो नागपुरातील एका मंत्र्यांकडे काम करतो. गेल्या ११ एप्रिलला कोरोनाची सौम्य लक्षणे वाटू लागल्याने त्याने स्वतःला होम क्वारंटाईन केले. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर चार दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आला. दरम्यान औषधोपचार घेऊनही तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. त्यामुळे पुन्हा सिटी स्कॅन केले. त्यात स्कोअर १२ आला. त्रास वाढू लागल्याने तातडीने दानिशला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर परत सिटी स्कॅन केले. त्यामध्ये २५ स्कोअर आला. त्यानंतर तीन-चार दिवस तो आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर राहिला. तिसऱ्यांदा केलेल्या एचआरसीटी रिपोर्टमध्ये संसर्ग वाढल्याचे आढळून आल्यानंतर दानिशची खऱ्या अर्थाने कोरोनाविरुद्धची लढाई सुरू झाली.
उपचार सुरू असलेले कोविड रुग्णालय नसल्याने व प्रकृती नाजूक असल्याने घरच्यांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वारंवार संपर्क करूनही ऑक्सिजनची सोय असलेली ऍम्ब्युलन्स मिळाली नाही. महत्प्रयासानंतर ऍम्ब्युलन्स मिळाल्यानंतर उपचाराला गती मिळाली. दानिशची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने व फुफ्फुसात संसर्ग वाढल्याने त्याला ऑक्सिजन व सलाईन लागले. दोनवेळा प्लाझ्मा देण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे पाच रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स दिले गेले. योग्यवेळी मिळालेले उपचार आणि डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे तब्बल १२ दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर तो बरा झाला. कोरोनामुक्त झाल्याचा दानिशला आनंद आहे. मात्र, लक्षणे असल्यावर वारंवार चाचणी करूनही, त्यात कोरोनाचे निदान होऊ न शकल्याचे त्याला आश्चर्यही वाटले. त्यामुळेही आपल्याला अधिक त्रास व मनस्ताप झाल्याचे दानिशने सांगितले.
कोरोनाला हलक्याने न घेण्याचा सल्ला -
दानिशसाठी एक महिन्याचा काळ खूप भयानक व परीक्षा घेणारा होता. अक्षरशः मृत्यूच्या दारापर्यंत तो गेला होता. मात्र, सकारात्मकता व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने कोरोनाविरुद्धची जीवघेणी लढाई जिंकली. कोरोना हा खरोखरच गंभीर आजार आहे. त्यामुळे कुणीही याला हलक्याने घेऊ नये, असे सांगताना त्याने संक्रमितांना भीती न बाळगण्याचा व सदैव पॉझिटिव्ह राहण्याचा संदेश दिला.