Gas Cylinder : नागपूर शहरात सिलिंडर ११५४ रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

domestic Gas Cylinder rs 1154 in nagpur women budget PM Ujjwala Yojana

Gas Cylinder : नागपूर शहरात सिलिंडर ११५४ रुपये

नागपूर : घरगुती गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक. घरगुती गॅसचे दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. निवडणुका पार पडताच गॅस ५० रुपयांनी महागला असून दर ११५४ रुपयांवर पोहोचले आहेत.

उज्ज्वला गॅस योजनेमुळे शहरांसोबतच ग्रामीण भागांतही सिलिंडरची मागणी वाढली आहे. मात्र, गॅसचे दर दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांना अर्थसंकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सिलिंडर लवकरच १५०० रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणीचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

चूल पेटविता येईना, गँस परवडेना

गॅस कितीही महाग झाला असला, तरी तो खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. घर लहान असल्यामुळे चूल मांडता येईना. चूल मांडण्यासारखी स्थिती असली तर जाळण्यासाठी लाकडे मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. मोलमजुरी करून संसार चालविणाऱ्यांनी मात्र, सिलिंडर शोकेसमध्ये ठेवला असून ते सकाळी लाकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडतात आणि पोटाची भूक भागवितात.

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

जानेवारी २०२१ मध्ये सिलिंडर ६९४ रुपयांना मिळायचा, तर मार्च २०२३ मध्ये हे दर तब्बल ११५४ रुपयांवर पोहोचले आहेत. मागील महिन्यात ११०४ रुपये होते, त्यात ५० रुपयांची वाढ झाली. घरगुती गॅसचे दर टप्प्याटप्प्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे ग्राहकांना थोडाफार आधार मिळायचा. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत रक्कम डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होत होती. परंतु गेल्या काही महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्याची स्थिती आहे.

टॅग्स :Nagpurwomengas cylinder