नागपूर : बाबासाहेबांच्या स्पर्शाने महाडचे पाणी झाले चवदार

महाड सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिन
Dr.Babasaheb Ambedkar Mahad Satyagraha
Dr.Babasaheb Ambedkar Mahad Satyagrahasakal

नागपूर : डोक्‍यावर-चटणी भाकरीचे गाठोडं, अंगावर फाटक्‍या लक्तरांचा बाज घेऊन हजारो बायाबापडी, म्हातारे महाडच्या तळ्याच्या दिशेने निघाले होते. समोर होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महाड येथे आपल्या लाडक्‍या नेत्याच्या पावलामागं पाऊल टाकीत सारा अस्पृश्‍यांचा काफिला नव्या क्रांतीच्या पर्वाचा इतिहास लिहिण्यासाठी निघाला होता. तो दिवस २० मार्च १९२७. बाबासाहेब तळ्याच्या शहाबहिरी घाटाच्या पायऱ्या उतरले. सभोवताल उभ्या असलेल्या अस्पृश्यांच्या नजरा बाबासाहेबांवर केंद्रित होत्या.

बाबासाहेबांनी चौफेर नजर टाकली आणि दुसरी नजर तळ्याच्या पाण्यावर रोखली. सारे श्‍वास रोखून होते. क्षणात बाबासाहेब खाली वाकले आणि ‘ओंजळभर पाणी’ हातात घेतले. प्राशन केले. बाबासाहेबांचे अनुकरण हजारो हातांनी केले. त्याचवेळी क्रांतीच्या एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. बाबासाहेबांच्या स्पर्शाने महाडचे पाणी चवदार झाले. आज २० मार्च २०२२ महाड सत्याग्रहाचा ९५ वा स्मृतिदिन. आंबेडकरी चळवळीचा प्रारंभ बिंदू असल्याची भावना समता सैनिक दलाचे संघटक सुनील सारिपुत्त यांनी सकाळशी संवाद साधताना व्यक्त केली.

अस्पृश्‍यता हा ‘शाप'' घेऊन जगणाऱ्यांना महाड क्रांतितून बाबासाहेबांनी पुकारलेल्या माणुसकीच्या बंडाने जगण्याचे नवे भान दिले. यामुळेच हजारो मुखातून एकच ‘डॉ. आंबेडकर की जय...आंबेडकर की जय'' हा एकच जयघोष सुरू होता. ज्या पाण्याला हजारो वर्षांपासून अस्पृश्‍यांचा स्पर्श झाला नव्हता, त्या तळ्याला एकाचवेळी हजारो अस्पृश्य हात लागले. या क्रांतीला बाबासाहेबांचे सहकारी संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार सवादकर, रामचंद्र मोरे, अनंत चित्रे, सुभेदार टिपणीस, रामचंद्र शिर्के, बापूराव जोशी, विठ्ठल धारिया या स्पृश्‍य पुढाऱ्यांनी साथ दिली होती, हे विशेष. ज्या कोकणात बाबासाहेबांचे लहानपण गेले, त्याच कोकणातून आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक क्रांतीचे बिगुल वाजले.

दवंडीने घात केला...

अस्पृश्‍यांनी महाड सत्याग्रह केला. परंतु वीरेश्‍वर मंदिराचा पुजारी बाळकृष्ण गुरव याने महाडमध्ये एक दवंडी पिटवली. महाडचे पाणी बाटले, आता वीरेश्‍वर मंदिरातील देव बाटवणार, असा प्रचार केला. यामुळे येथील स्पृश्‍यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन सत्याग्रहींवर हल्ला केला. जेवणं सुरू असताना त्यांच्यावर लाठ्यांनी वार केले. महाड रक्ताने लाल झाले. महाड क्रांतीला गालबोट लावण्याचे कारस्थान करणाऱ्यांच्या विरोधात बाबासाहेबांनी संयमी भूमिका घेतली.

असा आहे इतिहास...

कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या वीरेश्‍वर थिएटरमध्ये १९ आणि २० मार्च १९२७ रोजी बहिष्कृत हितकारिणी परिषद झाली. यापूर्वी ४ ऑगस्ट १९२३ साली रावबहादूर सी. के. बोले यांनी मुंबईच्या विधिमंडळात सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये आणि न्यायालये अस्पृश्‍यांसाठी खुले करण्याचा ठराव घेतला होता. बोले ठरावानुसार ५ जानेवारी १९२४ रोजी महाड नगर परिषदेने नाना टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील पाणवठे अस्पृश्‍यांसाठी खुली करण्याचा ठराव घेतला होता. यामुळेच याच ठरावाची अंमलबजावणी बाबासाहेबांनी अस्पृश्‍यांच्या साक्षीने महाड येथे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com