
Teachers Recruitment : ५५ हजार शिक्षक भरती होणार केव्हा? अभियोग्यता चाचणीधारक उमेदवारांचा सवाल
नागपूर : कुणावरही अन्याय न करता शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन अभियोग्यता चाचणीधारक उमेदवारांनी जिल्हाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देत राज्यात ५५ हजार शिक्षक भरतीला मुहूर्त केव्हा आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राज्य वित्त विभागाने शिक्षक भरतीसाठी ८० टक्के पद भरतीस मान्यता दिली आहे. राज्यात ६७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याच्या ८० टक्के म्हणजेच ५५ हजार जागेची शिक्षक भरती पूर्ण करून सर्व प्रवर्गांना समान न्याय द्यावा. अशी मागणी उमेदवारांची आहे.
स्थानिक प्रशासनामार्फत शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना दिलेल्या निवेदनात उमेदवारांनी म्हटले आहे की, २०१० नंतर महाराष्ट्रात शिक्षक भरती झालेली नाही. तसेच २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली.
ती बंदी उठवून राज्यात पहिल्यांदाच २०१७ साली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झाली. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक पदभरतीची घोषणा केली.
प्रत्यक्षात मात्र १२ हजार पदे विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली. ती भरती प्रक्रिया २०१७ पासून आजतागत सुरुच आहे. ही भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. जेणेकरून मागील सहा वर्षांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांना न्याय मिळू शकेल.
वित्त विभागाने मान्यता दिलेल्या ८० टक्के पदभरतीच्या ५५ हजार जागेची शिक्षक भरती याच ‘टिएआयटीमधून एकाच टप्प्पात करावी. शून्य बिंदू दाखवून सर्व प्रवर्गाला समान न्याय द्यावा. आरक्षणाच्या परसेंटेजनुसार द्याव्यात, २०२३ मध्ये टीएआयटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर लगेच सुरु करावी,
० ते २० पटसंख्या असलेल्या राज्यातील ४६०० शाळांवर १४ ते १५ हजार सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक न करता त्या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भराव्यात, २०१७ च्या १९६ संस्थांच्या जागेची निवड यादी त्वरीत लावण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी अर्चना बन्सोड, प्रविन वाढंरे, अनिकेत म्हस्की, वसीम अगवान, पल्लवी उरकुडे, प्रचित बन्सोड आदी उपस्थित होते.