Nagpur : अन् त्या पिल्लाचा टेडी बीअरने केला सांभाळ; करुणाश्रमात निर्जीव बाहुल्याने दिला मायेचा ओलावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : अन् त्या पिल्लाचा टेडी बीअरने केला सांभाळ; करुणाश्रमात निर्जीव बाहुल्याने दिला मायेचा ओलावा

वर्धा - स्वामी तीनही जगाचा आईविना भिकारी.. या कवितेच्या ओळी वर्धेतील करुणाश्रमात खऱ्या ठरल्या. नुकत्याच जन्म झालेल्या आठ दहा दिवसाच्या माकडाच्या पिल्लाने अपघातात त्याच्या आईला गमावले. त्याच्या जगण्याचीही शक्यता कमीच असल्याने त्याला करुणाश्रमात दाखल केले. येथे त्याला मायेची उब मिळावी म्हणुन टेडी खेळण्यासाठी दिला आणि त्या निर्जीव बाहुल्यात त्या पिल्लाने त्याची आई शोधली.

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहचे हाक माते, मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी

ही न्यूनता सुखाची, चिती सदा विदारी

स्वामी तीनही जगाचा आईविना भिकारी.

स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी... भूलोक, पाताळ आणि स्वर्गलोक या तिनही लोकात आईचे महत्व श्रेष्ठ मानल्या जाते. माणूस असू की प्राणी आई हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी एक हृदयद्रावक घटना घडली. समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना माकडाच्या कळपातील एका मादी माकडाचा अपघात झाला. यात मादी माकडाचा मृत्यू झाला. रस्त्यावर रक्तभंबाळ झालेल्या त्या माकडाला तिचे अवघ्या पंधरा दिवसाचे पिल्लू बिलगून होते.

मादी माकड आणि पिल्लाला करुणाश्रमात आणण्यात आले. आईच्या मृत्यूनंतर पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान होते. पिल्लाचे मन रमविण्यासाठी खेळण्यातल मोठं बाहुलं या पिल्लाजवळ ठेवलं. हळूहळू या निर्जीव बाहुल्यात माकडाच्या पिल्लाने आपली आई शोधली.

माकड दुध पित नसल्याने शक्कल लढवित बाहुल्याच्या शरीराला दुधाची बाटली बांधून शेळीचे दूध पिल्लाला पाजण्यास सुरवात केली. दिवसेंदिवस माकडाचे पिल्लू आणि टेडी बीअरयांच्यातील नाते घट्ट झाले आणि टेडी बीअरलाच आपली आई समजत पंधरा दिवसांचे पिल्लू आता दोन महिन्यांचे झाले आहे.

टॅग्स :Nagpur