लकडगंजमध्ये आगीचे तांडव; डीपीला लागलेली आग कारणीभूत

व्‍यापाऱ्यांचे एक कोटीचे नुकसान; चार तासांनंतर आगीवर नियंत्रण
fire in Lakdaganj DP caused the fire nagpur
fire in Lakdaganj DP caused the fire nagpur sakal

नागपूर : मध्य भारतातील लाकूड खरेदी विक्रीचा मोठी बाजारपेठ असलेल्या लकडगंजमध्ये आरामशीनला लागून असलेल्या डीपीतील आगीमुळे पाच आरामशीनसह दहा दुकानांची राखरांगोळी झाली. या आगीत लाखो रुपयांचे लाकूड, फर्निचर जळाले. आग एवढी भीषण होती की पाच-सहा किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली.

जुना भंडारा रोडवरील दानागंज हरिहर मंदिराच्या बाजूलाच असलेल्या आरामशीनच्या संरक्षण भिंतीजवळच विद्युत विभागाची डीपी आहे. या डीपीला आज सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आग आरामशीनपर्यंत पोहचली. कुणाला काही कळण्याच्या आतच आग आणि धुराचे लोट उठले. पाच आरामशीनसह दहा दुकानांची डोळ्यादेखत राख झाली. लाखो रुपये किंमतीचे लाकूड आणि फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या विविध केंद्रावरून नऊ अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाकडून पाण्याचा मारा सुरू असतानाच नागरिकांनीही गर्दी केली. दुरूनच धूर दिसत असल्याने अनेक नागरिक या परिसरात आले. आग इतरत्र पसरू नये, यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून परिसर धोक्याबाहेर करण्यात आला.

टॅंकरचालकांनी पाण्यासाठी रोखले

याच परिसरात जलकुंभ असून येथे आणीबाणीच्या स्थितीसाठी हायड्रंटही आहेत. अग्निशमन विभाग आग विझवत असताना जवळच असलेल्या या हायड्रंटवरून पाणी घेत होते. परंतु टॅंकरचालकांनी अक्षरशः अग्निशमनच्या जवानांच्या हातातील पाण्याचा पाइप हिसकावून घेतल्याचे स्थानिक रहिवासी परमजीत सिंग कलसी यांनी सांगितले. त्यामुळे अग्निशमन विभागाला पाण्यासाठी ऐनवेळेवर इतरत्र भटकावे लागले. मनपाच्या राम मनोहर लोहिया या शाळेतून तसेच कळमना परिसरातील जलकुंभातून पाणी आणावे लागले. जलप्रदाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीमुळे अनेकांनी रोष व्यक्त केला.

डीपी देखभालीकडे दुर्लक्ष?

काही दिवसांपूर्वीच सीताबर्डी येथे डीपीला आग लागली. आजही डीपीमुळेच दहा दुकानांची राखरांगोळी होऊन एक कोटीचे नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे. महावितरणकडून डीपीची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याचे गेल्या काही घटनांतून दिसून येत आहे. एखादवेळी निवासी वस्तीमध्ये डीपीमुळे घरे जळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने डीपीची तपासणी करून त्यातील ऑइल आदीबाबत खात्री करणे गरजेचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

डोळ्यासमोरच लाखोंचे नुकसान

आगीत सुरूची बरबटे, दीपक आगरे, विष्णू पडोळे, अजय चाफले आणि भूषण सावंत यांच्या लाकडासहीत आरामशीन जळाल्या. तसेच महालक्ष्मी वूड वर्क्स, एम. एस. टिंबर मार्ट, गजानन फर्निचर, वैभव लक्ष्मी टर्निंग, मा भगवती टिंबर या पाच दुकानांमधील फर्निचर, लाकूड पूर्णपणे जळाले. सर्व मिळून एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुकानदार, व्यापारी निराश

कोरोनानंतर व्यवसाय स्थिरावत असतानाच दुकाने, आराममशीन जळाल्याने दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये कमालीची निराशा पसरली. तसेच येथे काम करणाऱ्यांचे रोजगारही संकटात आले आहेत. तथापि, १९ लाख रुपयांचे लाकूड व फर्निचर वाचविण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com