काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे यांचे निधन 

Former MLA Sunil Shinde passes away
Former MLA Sunil Shinde passes away

नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व म्हाडा सभापती सुनील शिंदे (79) यांचे गुरुवारी सकाळी काटोल येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते घरातील बाथरूममध्ये भोवळ येऊन कोसळले होते. त्यांना कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक आणि अगदी सुरुवातापासूनचे सहकारी होतं.  बुधवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिवस साजरा झाला, हे विशेष... 

सुनील शिंदे यांनी मृत्यूपूर्वी चिरंजीव नागपूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे यांच्याशी सकाळी नऊ वाजता भ्रमणध्वणीवर संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी शेतातील आंब्याची काय स्थिती आहे याची माहिती घेतली. शेतात पाहणी करण्यास सतीश यांना सांगितले होते. तसेच शेतातील मोटर सुरू करण्यास सांगितले. यानंतर सतीश शेतात गेले तर सुनील शिंदे हे बाथरूममध्ये गेले होते. यावेळी त्यांना भोवळ आली व कोसळले.

सुनील शिंदे यांनी म्हाडाचे सभापतीपदसुद्धा भूषविले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. संत्र्याला भाव मिळावा यासाठी अनेकदा रस्त्यावर व हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली. गेली अनेक वर्षे ग्राम पंचायत, सावरगाव येथे त्यांची सत्ता होती. अनेक विकासकामांची गंगा त्यांनी सावरगाव तसेच आमदार म्हणून काटोल विधानसभेत आणली. काटोल तालुक्‍यातील डोंगरगाव येथे एम.आई.डी. सी. आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. संत्रा कारखाना सुरू केला होता. अशा नेत्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे. 

शुक्रवारी अंत्यसंस्कार

काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या निधनानंतर शोक व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. 12) मुळगावी सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुलगा सतीश शिंदे यांनी सांगितले.

'चरखा'वर लढले होते पहिली निवडणूक

984-85 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक चरखा या चिन्हावर सुनील शिंदे लढले होते. पाच वर्ष आमदार म्हणून काम यशस्वीपणे काम केल्यानंतर 1990 मध्ये पुन्हा निवडणूक लढले आणि विजयी झाले. दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर कामे केली. शरद पवार यांना काटोलला बोलावून त्यांनी 50 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. आधीपासूनच त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्याची आवड होती. अगदी काल-परवापर्यंत ते आपल्या कामांत ऍक्‍टीव होते. शरद पवारांना जेव्हा बेळगावसाठी आंदोलन केले होते, तेव्हा दिल्लीला उपोषणात ते सहभागी झाले होते. 

शरद पवारांचे विश्‍वासू सहकारी

समाजवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना पवारांच्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये ते त्यांच्या सोबत राहीले. पंजाबराव देशमुखांना जेव्हा यवतमाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लढवण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला. तेव्हा तेथील जबाबदारी शरद पवारांनी सुनील शिंदे यांच्यावर सोपवली होती. तेव्हा ते विधानसभेचे प्रतोद होते. कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांसोबत निवडणुकीच्या मैदानात दोन हात करून त्यांनी तेथे विजयश्री खेचून आणली होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कीर्ती गांधी पराभूत झाले होते. पक्षाच्या नागपुरातील अनेक मोर्चे, आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी यशस्वीपणे केले होते. त्यामुळेच शरद पवारांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.

राजकारणातील सच्चा नेता गेला

सावरगाव येथे शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, पोलिस चौकी आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केली होती. आपल्या गावाला टॅक्‍स फ्री ग्रामपंचायत बनवण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. पाच वर्षांपूर्वीपर्यंत सावरगावात घर टॅक्‍स केवळ एक रुपया घेतला जात होता. सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी गावासाठी आणि मतदार संघासाठी कामे खेचून आणली होती. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सच्चा नेता गेल्याची भावना राजकीय व सामाजिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com