esakal | रेमडेसिव्हिरचा काळाबाजार आणखी उघडकीस, आरोपींमध्ये पत्रकाराचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार आणखी उघडकीस, आरोपींमध्ये पत्रकाराचा समावेश

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : कोरोना रुग्णांना टोचण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करून नातेवाईकांकडून पाचपट पैसे उकळणाऱ्या आणखी चौघांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये एका पोर्टलच्या पत्रकाराचा समावेश आहे. या आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या चार रेमेडेसिव्हिरसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विकास ऊर्फ विवेक लक्ष्मणराव ढोकणे पाटील (३४, आर्चर क्राऊन, मनीषनगर), अमन जितेंद्र शिंदे (२१, मॉडेल मिल चौक, गणेशपेठ) आणि ईश्वर ऊर्फ बिट्टू मुकेश मंडल (२८, मार्टिननगर), रोहित संजय धोटे, रजत दिलीप टेंभरे, मनोज रामाजी नंदनकर आणि महेश दामोधर ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. विकास ऊर्फ विवेक ढोकणे फार्मा वितरक असून तो एका पोर्टलचा पत्रकार आहे. ईश्वर, रोहित, रजत आणि मनोज शुअरटेक हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत.

हेही वाचा: हृदयद्रावक! उपचाराअभावी कोरोनाग्रस्तानं प्रवासी निवाऱ्यात तडफडून सोडले प्राण; ब्रह्मपुरीतील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास ढोकणे पाटील नावाचा पत्रकार रेमेडेसिव्हिर इंजेक्शन २० ते २५ हजारात विकत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली होती. आयुक्तांनी ही माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना देऊन कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजतापासून पोलिसांची टोळी पाळत होती. पोलिस उपनिरीक्षक नवनाथ देवकाते यांनी विकास ढोकणेचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर पोलिसांच्या पंटरने विकाससोबत संपर्क साधला. त्यावेळी माझ्याकडे दोनच इंजेक्शन असून ते इंजेक्शन प्रत्येकी २३ हजारात देईन असे सांगितले. त्यावर पंटरने सहमती दर्शविली. विकासने जरीपटका हद्दीत मार्टिननगर येथे येत असल्याचे पंटरला सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मार्टिननगर पुलाभोवती सापळा रचला. रात्रीच्या वेळी विकास कारने मार्टिननगर येथे आला. तोच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने त्याला पकडले. तपासात अमन शिंदे आणि ईश्वर मंडल यांचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

हेही वाचा: आता चक्क कार्यालयासमोरच होणार कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आढळल्यास गुन्हा दाखल

पोलिसांनी तिघांची विचारपूस केली असता शुअरटेक येथे कामाला असलेल्या वॉर्डबॉयने रेमडेसिव्हिर दिल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य चौघांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून वेगवेगळ्या कंपन्यांचे ४ रेमडेसिव्हिर, रोख १३ हजार रुपये, चारचाकी वाहन, महागडे घड्याळ, चार मोबाईल आणि दुचाकी असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विकास कन्यक फार्मा येथे तर अमन रेणुका फार्मा येथे काम करीत असल्याची माहिती आहे. महेश ठाकरे औषधीच्या दुकानात काम करतो.

शुअरटेक हॉस्पिटलमध्ये गोरखधंदा -

आरोपी ईश्वर मंडल, रजत टेंभरे, रोहित धोटे आणि मनोज नंदनकर हे शुअरटेक हॉस्पिटलमध्ये कामाला होते. शुअरटेक येथे भरती असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर आणण्यास सांगून त्यातील काही इंजेक्शन ते वापरायचे. उर्वरित इंजेक्शन चोरून ते अमनला द्यायचे. अमन हा विकासला इंजेक्शन विकण्यासाठी देत असे. अतिदक्षता विभागात रुग्णांशिवाय अन्य कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे काही इंजेक्शन रुग्णाला देऊन उर्वरित इंजेक्शनची ते विक्री करायचे असा त्यांचा गोरखधंदा होता अशी कबुली आरोपींनी दिली.