G20 Summit : पाहुण्यांचे दणक्यात स्वागत ;ढोलताशांचा गजर G20 Summit Nagpur Guests welcome Foreign visitors special festoons | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी पाहुण्यांना खास फेटे बांधून

G20 Summit : पाहुण्यांचे दणक्यात स्वागत ;ढोलताशांचा गजर

नागपूर : जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेंतर्गत आयोजित सी-२० बैठकीसाठी विविध देशातील ६० प्रतिनिधी व आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्यासह देशातील विविध तज्ज्ञांचे रविवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले.

डॉ. बाबासाहेब विमानतळावर त्यांना विशेष फेटे बांधून सुताच्या माळेने त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर येताच ढोलताशांचा गजराने काहींनी कानावर हात ठेवले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने त्यांनीही दाद दिली.

हॉटेल रेडिसन ब्लू येथे सोमवारपासून आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेअंतर्गत सी-२० परिषद सुरू होत आहे. या दोन दिवसीय परिषदेसाठी रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जी-२० देशांच्या ६० प्रतिनिधींचे तसेच भारतीय तज्ज्ञ, असे एकूण १२५ जणांचे उपराजधानीत आगमन झाले.

या परदेशी पाहुण्यांना खास फेटे बांधून ढोलताशे वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले. मरामोळे आदरातिथ्य पाहून परदेशी पाहुणेही भारावून गेले. भारावलेल्या परदेशी पाहुण्यांनी थेट मराठीत नमस्ते इंडिया म्हणत नागपूरकरांचे आभारही मानले.

स्वागतासाठी केवळ प्रशासनाकडून अधिकारीच नव्हे तर विमानतळाबाहेर नागपूरकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमानतळाबाहेर विदेशी पाहुणे एक-एक बाहेर येत असताना नागपूरकरांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनीही मान खाली व दोन्ही हात जोडून नागपूरकरांचे अभिवादन केले. तेव्हा बाहेर ढोलताशांचा गजर सुरू होता.

पाहुण्यांचे धुमधडाक्यात स्वागत

अनेकांनी त्याकडे उत्सुकतेने बघितले अन् हॉटेलकडे रवाना होण्यासाठी महापालिकेच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसमध्ये बसले. विमानतळापासून ते परिषदेच्या ठिकाणापर्यंत ‘वसुधैव कुटुंबकम’च्या संकल्पनेचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात परिषदेची चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. विमानतळ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही होता. पोलिस बंदोबस्तात विदेशी पाहुण्यांना हॉटेलपर्यंत पोहोचविण्यात आले.

महापालिकेच्या बसेसमधून हॉटेलमध्ये

विदेशी पाहुण्यांना हॉटेलपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या आपली बस ताफ्यातील सहा इलेक्ट्रिक बसची सोय करण्यात आली होती. बसच्या प्रत्येक सीटला जी-२० लोगो असलेले सिटकव्हर लावण्यात आले होते.