Nagpur : पोलिसांपासून बचावासाठी गुंड घेतात शौचालयाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goons take shelter of toilets to escape from police crime kamthi nagpur

Nagpur : पोलिसांपासून बचावासाठी गुंड घेतात शौचालयाचा आधार

कामठी : शहरात कोट्यवधींचा खर्च करून बांधलेले शौचालय हे शोभेची वास्तू ठरत आहे. या शौचालयाचे काम पूर्ण झाले असले तरी ते नागरिकांसाठी सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी साहित्य चोरून नेले आहे. तर काही शौचालय दारूड्यांचा अड्डा झाले आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकार द्वारे संपूर्ण देशात व राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. कामठी नगर परिषदेने सुद्धा कामठी शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोट्यवधींचे काम केले आहे. सर्वात प्रमुख म्हणजे शहरात बऱ्याच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आले. काही शौचालय जनतेच्या उपयोगी सुरू करण्यात आले तर नव्याने सहा वॉर्डात प्रत्येकी एक सुलभ शौचालय बांधण्यात आले.

मात्र पाच ठिकाणचे काम पूर्ण होऊनही जनतेच्या सोयी साठी सुरू करण्यात आले नसल्याने या सुलभ शौचालयातील लागलेले सामान चोरीला जाऊ लागले आहे. सर्वात म्हणजे या शौचालयाची जागा निश्चित करण्यापूर्वी काळजी घेण्यात आली नसल्याने नवनिर्मित शौचालय असामाजिक तत्वाच्या कामात येत असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांनी अड्डा बनविला आहे.

गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या अभियान अंतर्गत कामठी नगर परिषदेच्या वतीने मे २०१५ पासून शौचालय योजनेची सुरुवात करण्यात आली. यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी वैयक्तिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले. १४ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत जवळपास ३० लाखांच्या निधीतून कामठी शहरातील जवळपास सहा ठिकाणी नावीन्यपूर्ण सुलभ शौचालय उभारण्यात आले.

मात्र हे शौचालय नागरिकांच्या उपयोगासाठी सुरू करण्यात आले नाही. शासकीय निधीतून बांधलेले हे शौचालय अनुपयोगी ठरत आहे. त्या शौचालयाची दुरवस्था होत आहे. तर कामठी नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सार्वजनिक शौचालय योजनेचे तीनतेरा वाजले असून खुद्द कामठी नगर परिषद प्रशासनाकडूनच शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे.

चोरट्याचे बनले आश्रयस्थान

शौचालायचे कंत्राट मीठा नीम नावाच्या संस्थेला तीन तर तीन शौचालायचे कंत्राट अग्रवाल याच्या संस्थेला देण्यात आले होते. जरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणारे कार्य जनतेच्या सोयीसाठी असले तरी मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्या आंधळेपणाने जनतेच्या रकमेचा दुरुपयोग होत आहे.

याकडे कोट्यवधींची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. या सहा सुलभ शौचालयापैकी नवीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच तर जुने पोलिस ठाणे हद्दीत नया नगरातील सुलभ शौचालय आहे. रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्व या सुलभ शौचालयाचा वापर करीत आहे.

हे नवनिर्मित शौचालय रस्त्यावर नसून आतल्या व अंधाराच्या भागात असल्याने पोलिस विभागाचे कर्मचारी सुद्धा रात्रीच्या वेळी या स्थळांकडे लक्ष देण्याची आवश्यकता समजत नाही. हे सुलभ शौचालय लवकरात लवकर जनतेच्या उपयोगाकरिता सुरू करावे तसेच पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या गतीविधीला आला घालण्यास प्रयत्न करावे, अशी जनतेकडून मागणी होत आहे.

अर्धवट कामाचे काढले बिल

नगर परिषदेने सैलाब नगर, कुंभारे कालोनी गौशाळे जवळ, कामगार नगर, नया नगर, पारशीपुऱ्या समोरील पटांगण व रमानगर पाणीटाकी जवळ शौचालय बांधण्यात आले. तर छत्रपती नगरातील शौचालायचे काम सुरू आहे. येथील सैलाब नगर जवळील सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली असता या शौचालय इमारतीला भेगा पडलेल्या आहेत. स्टील रेलिंग तुटलेली आहेत.

सेफ्टी टॅंक फुटलेली आहे, अशी दुरवस्था दिसून येत आहे. या कामाच्या कंत्राटदारांनी या कामाच्या अधिकतर बिलाची उचल केली तर वॉर्ड क्रमांक १६ मधील सुलभ शौचालायचे काम सुरू आहे या मीठा नीम नावाच्या संस्थेला या अर्धवट कामाचे बिल काढले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.