सुटीच्या दिवशी आजारी पडायचे नाही! ‘ओपीडी' बंद | OPD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OPD

सुटीच्या दिवशी आजारी पडायचे नाही! ‘ओपीडी' बंद

जलालखेडा (जि. नागपूर) - नरखेड तालुक्यातील खासगी डॉक्टरांकडील उपचार महागडे झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयात उपचार करवून घेण्यास प्राधान्य देत आहेत. रविवारी व इतर सुटीच्या दिवशी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर रविवारी व सुटीच्या दिवशी आजारी पडायचे नाही, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

नरखेड तालुक्यातील आरोग्यविषयी मदार ही एक ग्रामीण रुग्णालय व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या आयुर्वेदिक दवाखाने व उपकेंद्रांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांची कमतरता आहे. त्यातच खासगी उपचार आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असल्याने ग्रामीण भागातील सामान्य नागरिक शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपचार करवून घेण्यावर भर देतात.

शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग रविवारी व सरकारी सुटी असल्याने बंद ठेवला जातो. शासकीय रुग्णालयांमध्ये रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली जाते. अपघात विभाग २४ तास सुरू असतो. गंभीर रुग्ण दाखल झाल्यास त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात. सोबतच अपघात व इतर घटनांमधील जखमी व गंभीर रुग्णावर प्राथमोपचारही केले जातात. इमर्जन्सी असल्यास संबंधित रुग्णांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटल व मेयो रुग्णालयात हलविण्यात येते.

हेही वाचा: नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून शाळकरी मुली ‘टार्गेट’

सर्व शासकीय रुग्णालयांत रविवारी व इतर सरकारी सुटीच्या दिवशी केवळ आपत्कालीन रुग्णावंर उपचार केले जातात. त्यामुळे गरजूंना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याशिवाय गत्यंतर नसते. ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवेसह एक्स- रे रक्त तपासणी, औषध वाटप या सेवाही रविवारी व सुटीच्या दिवशी बंद असतात. रक्ततपासणी इतर दिवशीही केवळ ओपीडीच्या वेळेतच केली जाते. खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर आहे.

रविवारी व सुटीच्या दिवशी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी बंद राहते. त्या दिवशी प्रकृती बिघडल्यास अनेकांना खासगी रुग्णा धाव घ्यावी लागते. विशेष करून ग्रामीण भागात उपचार मिळत नाही. सुटीच्या दिवशी शासकीय रुग्णालयातील ओपीडी सुरु राहिल्यास त्याचा लाभ ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मिळेल. यासाठी शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रुग्ण कल्याण समितीचे सदस्य योगेश मांडवेकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: नागपूर : स्थानिकांना युवकांना वेकोलीत रोजगार देणार - सुनील केदार

दररोज ओपीडी'त १०० ते ८०० रुग्णांची नोंद

सध्या प्रतिकुल वातावरणामुळे छोटेमोठे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात सरासरी रोज २०० ते २५० रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी सरासरी १७५ ते २५० आणि आयुर्वेदिक दवाखान्यात १०० ते १५० रुग्णांची नोंद व तपासणी केली जाते. प्रत्येक सोमवारी व सुटीनंतरच्या दिवशी शासकीय रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येते.

शासनाच्या नियमानुसार कामकाज सुरू आहे. सुटीच्या दिवशी अत्यावश्यक सेवा सुरु राहतात. गंभीर रुग्ण आल्यास त्याला प्राथमिक उपचार करून त्यांची काळजी घेण्यात येते.

- डॉ. हरीष महंत, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, नरखेड

Web Title: Government Hospital Opd Close On Holiday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurGovernment hospital