Gudi padwa 2023 : गुढीपाडवा : सण उत्सवाचा, चैतन्याचा gudi padwa 2023 Festival of celebration spirit Chhoti Aarti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gudi padwa

Gudi padwa 2023 : गुढीपाडवा : सण उत्सवाचा, चैतन्याचा

-प्रा. वर्षा चोपडे

गुढीपाडवा काय असतो ग?

छोटी आरती आपल्या आजीला म्हणाली आजी गुढी पाडवा काय असतो ग? आजी हसली आणि म्हणाली, ‘गुढी पाडवा हे नाव दोन शब्दांपासून आले आहे.गुढी, ज्याचा अर्थ ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते.

‘आज्जी कोण ग कोण ब्रम्हदेव’?

आजी परत म्हणाली, ‘सनातन धर्मानुसार ब्रह्मा ही सृष्टीची देवता आहे. हिंदू तत्त्वज्ञानात, तीन मुख्य देवता आहेत, ज्यामध्ये ब्रह्मा विश्वाचा निर्माता आहे, संरक्षक विष्णू आणि संहारक महेश (शिव) आहे.

आजी पुढे म्हणाली, ‘या सणाला दक्षिण भारतात उगादी म्हणतात आणि तो विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा आणि उत्सव साजरा केला जातो. हा सण भारतातील इतर राज्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांसाठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून ओळखला जातो.’

परत आरतीने उत्सुकतेने विचारले, ‘आजी माझी आई म्हणते प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. खरे आहे का गं?’ ‘हो अगदी खरे आणि दुसरी प्रचलित गोष्ट अशी की बौद्ध दीक्षा सुरुवात इसवी सन ७८ मध्ये वसंतऋतूच्या सुमारास झाली.

आज्जी गुढी कशी उभारायची असते?

जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या फुलांचा हार , साखरेची गाठी बांधावी, अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. नैवेध दाखवावा सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. आणि हो संध्याकाळी ही गुढी काढून टाकावी. अशी परंपरा आहे.

आज्जी गुढीवर कलश का गं लावतात?

गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते.

गुढी आणि संतपरंपरा

संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय ४/६/१४ मधील ओळींत आणि अनेक ठिकाणी ‘विजयाची गुढी’ व असे अनेक गुढी पाडव्याचे उल्लेख, गुढी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात. एकें संन्यासी तोचि योगी। ऐसी एकवाक्यतेची जगीं। गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरीं।। हा श्लोक गुढीशीच संबंधित आहे.

आणि “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य, त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शवते.

संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.

संत तुकाराम महाराजदेखील आपल्या अभंगात म्हणतात,

पुढे पाठविले गोविंदे गोपाळा। चपळा हाती गुढी।।

यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहिती होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते.

आपले छत्रपती शिवाजी राजे गुढी उभारायचे का गं आज्जी?

बाळा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या विजयानंतर सर्वप्रथम गुढीपाडवा साजरा करण्यास सुरुवात केली. राजघराण्यात गुढी उभारण्याची परंपरा शिवाजीराजांनी सुरू केली आणि तेव्हापासून मराठी घराणेशाही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ती पाळतात. असे मी कुठेतरी वाचले होते नक्की नाही सांगता येणार. लोक आपल्या दिवसाची सुरुवात कडुनिंबाची पाने खाऊन करतात. शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे.

आज्जी गुढीचा उत्साह समाजात आहेच या दिवशी लोक काय काय करतात?

बाळा, नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवाची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते. नवीन सुरुवात करण्यासाठी, लोक नवीन कपडे , नवीन वस्तू ,सोने खरेदी करतात आणि आंब्याची पाने आणि फुलांनी त्यांची घरे सजवतात. देशातील काही भागात सणाच्या दिवशी, लोक पाणी आणि शेणाचे मिश्रण वापरतात आणि ते त्यांच्या घराच्या आसपासच्या भागात शिंपडण्यासाठी वापरतात. ते देवांची पूजा करतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये, भाविक दिवसाची सुरुवात तेल स्नानाने करतात. नातेवाईकही एकत्र जमून उत्सव साजरा करतात.

पण आज्जी मला सांग गुढी पाडवा आणि दिवाळी पाडाव्यात फरक आहे?.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. तो पाडवा वेगळा आणि त्याची कथाही वेगळी या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. गुढी पाडवा आणि दिवाळी पाडाव्यात फरक आहे.

आजीने आरतीला जवळ घेतले आणि तिचे कौतुक केले. पुढच्या पिढीला दिलेली माहिती तिने तिला माहिती होती तेवढी सांगितली याचा तिला आनंद झाला.

- कोची केरळ