esakal | पीक विम्याची तक्रार कोठे करायची? जाणून घ्या प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

crop insurance

पीक विम्याची तक्रार कोठे करायची? जाणून घ्या प्रक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) राज्यात 2016च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. मात्र, आधी ती कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक होती. आता गेल्यावर्षीपासून सरकारने कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात. पण, पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं? तसेच पीकविम्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या नेमक्या कुठं नोंदवायच्या? (complaint about crop insurance) याबाबत अनेकांना माहिती नसते. (how to do complaint about crop insurance)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

पीक विमा मंजूर झाला की नाही कसं तपासायचं?

  • शेतकऱ्यांनो तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते आपल्याच मोबाईलवर पाहू शकता.

  • सर्वप्रथम पंतप्रधान पीक विमा योजनेच्या PMFBY च्या ऑफिशिअल वेबसाइटवर जावे. त्यानंतर Application Status या पर्यायावर क्लिक करा.

  • तुम्हाला पीक विमा काढताना पावती मिळाली असेल तर त्या पावतीवरील क्रमांक टाका. त्यानंतर कॅप्चा टाका. त्यानंतर Check Status वर क्लिक करा.

  • तुमचा विमा मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे लिहून येईल.

पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते का, असा सहज प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. मात्र, या आपल्या शंका किंवा तक्रारींना योग्य उत्तरे विमा कंपन्या किंवा बॅंकांकडून मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

विम्यासंबंधी तक्रार कोठे करावी?

  • शेतकऱ्याने नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी.

  • मोबाईलमधील मोबाईलमधील Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स) ॲपद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकाद्वारे ही पूर्वसूचना देता येईल.

  • इंटरनेटमुळे अॅप सुरू होत नसेल किंवा टोल फ्री नंबर सतत एंगेज येत असल्यास तातडीने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन पूर्वसूचना द्यावी.

  • तुमची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे. अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात. मात्र, याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे तक्रारीची पोच घेणे गरजेचे आहे. पोच अर्जावरचा सही, शिक्का हा तुमच्या तक्रारीचा अधिकृत पुरावा असेल.

पीक विमा म्हणजे काय? -

पीक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन जोखमींमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यास शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक आग, जलप्रलय,कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. तसेच नैसर्गिक आपत्ती झाली नसल्यास लाभ मिळत नाही हा दृष्टिकोन ही पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांनी ठेवणे आवश्‍यक आहे