भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत; प्रियांका झाल्टे यांनी केले सात खंड तयार

भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत आणण्याचे मोठे काम अस्तित्व फाउंडेशनच्या प्रियांका राहुल झाल्टे यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत
भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीतSakal

नागपूर : समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित वंचित, महिला, दिव्यांगांसह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेत आहेत. त्या राज्यघटनेबाबत जागृती डोळस व्यक्तींमध्ये आहे. परंतु, अंध बांधव मराठीतील राज्यघटनेच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. आता डोळसांप्रमाणेच अंधांनाही राज्यघटना वाचण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत आणण्याचे मोठे काम अस्तित्व फाउंडेशनच्या प्रियांका राहुल झाल्टे यांनी केले आहे.

समता सैनिक दलातर्फे आयोजित वाचक मेळाव्यासाठी मुंबईहून आलेल्या प्रियांका यांच्याशी संवाद साधताना त्यांनी ब्रेल लिपीतील राज्यघटनेबद्दल माहिती दिली. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारापासून ते कर्तव्याप्रती जागरूकता वाढत असताना अंधांना राज्यघटनेचे महत्त्व ऐकूनच ठाऊक आहे. ते ब्रेल लिपीत आणण्यासाठी प्रियांका झाल्टे यांनी अस्तित्व संस्थेतील १५ अंध मुलांची आणि प्रेलर टाईपरायटरची मदत घेतली.

राज्यघटनेचे ब्रेल लिपीत सात खंड तयार झाले आहेत. राज्य सरकारने पहिल्या खंडाचे प्रकाशन केले असून, यात राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्य या प्रकरणांची माहिती ब्रेल लिपीत आहे. त्यामुळे ती माहिती आता अंध व्यक्तीही वाचू शकणार आहेत. ब्रेल लिपीतील राज्यघटनेच्या खंडात इंडेक्‍स तसेच अनुच्छेदांची यादी असणार आहे. ब्रेल लिपीतील सात खंडाच्या एकूण पानांची संख्या ८०० वर गेली असल्याची माहिती ‘सकाळ’शी बोलताना झाल्टे यांनी दिली. या लिपीसाठी महत्त्वाची असलेले उठावटिंबे दबली जाऊ नयेत यासाठी एक सलग खंड प्रकाशित केलेला नाही. वाचनात अडचण निर्माण होऊ नये यासाठी सात खंडात विभागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील एका संस्थेत ब्रेल लिपीतील धार्मिक ग्रंथांपासून अनेक पुस्तके आहेत. राज्यघटना मात्र ब्रेल लिपीत नव्हती. यानंतर १५ अंध मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत राज्यघटना ब्रेल लिपीत तयार केली आहे. आंबेडकरी विचारवंत डॉ. भगवंतराव गायकवाड यांचे ‘दस स्पोक आंबेडकर’ हे पुस्तकही ब्रेल लिपीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com