
इस्रोचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल
चंद्रपूर : आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी तब्बल सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’च्या दोन वैज्ञानिकांनी शुक्रवारी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी आणि पवनपार या गावांना भेट दिली. सिंदेवाही पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेले सहा गोळे आणि धातूच्या रिंगाची त्यांनी पाहणी केली. इस्त्रोच्या वाहनातून या सर्व वस्तू तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.
शनिवार, दोन एप्रिल रोजी आकाशातून वेगाने येणारे आगीचे गोळे विदर्भात सर्वदूर अनेकांनी बघितले. आगीचे हे गोळे गुजरात, कच्छ, जळगाव, अमरावती, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या मार्गाने आले. यातील काही अवशेष त्याच रात्री सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात ग्रामपंचायत भवनाच्या मागील परिसरातच पडले होते. या अवशेषात आगीचे गोळे आणि धातूची रिंग होती.गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला दिली.
पोलिसांनी धातूची रिंग आणि लोखंडी गोळा आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवनपार परिसरातील जंगलात व ब्रह्मपुरी, सावली तालुक्यातील आसोलामेंढा, चिमूर तालुक्यातील रानतळोधी, तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एका शेतात असेच लोखंडी गोळे आढळून आले होते. प्रारंभी हे अवशेष न्यूजीलंडच्या ब्लॅाक स्काय उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणाऱ्या रॅाकेटचे अवशेष असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर धातूची रिंग आणि गोलाकार सिलिंडर हे चिनच्या उपग्रहाचे युनिटचे भाग असल्याचा दावा करण्यात आला होता.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोलाकार आकाराचे सिलिंडर सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने इस्त्रोला पत्र पाठविले होते. सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (ता. ८) इस्त्रोचे शास्त्रज्ञ जिल्ह्यात दाखल झाले. इस्त्रोच्या या पथकात शाहजहान एम. आणि मयुरेश शेट्टी यांचा समावेश होता. शास्त्रज्ञाच्या या चमूने लाडबोरी, पवनपार गावांतील नागरिकांशी चर्चा केली. सिंदेवाही पोलिस ठाण्यात असलेली धातूची रिंग, गोलाकार आकाराच्या सिलिंडरची पाहणी केली. यावेळी स्काय वॅाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे हेसुद्धा उपस्थित होते.
संशोधनानंतरच माहिती मिळेल
सापडलेले अवशेष सॅटेलाईट रॉकेट बुस्टरचे असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे. मात्र, सिलिंडरमध्ये कोणते इंधन होते. ते नेमके कोणत्या देशाने सोडले. ते प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर सांगता येईल, असे या वैज्ञानिकांनी सांगितले. हे अवशेष कोण्या देशाचे, कुणाची जबाबदारी हे सांगण्यास मात्र या वैज्ञानिकांनी नकार दिला. एका आठवड्यात यावर संशोधन करून निर्णय दिला जाईल, असे या वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आले.
Web Title: Isro Team Arrives In Chandrapur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..