esakal | ब्रेकींग - ज्योतिरादित्य शिंदेंचा सरसंघचालक प्रणाम! संघ मुख्यालयात मोहन भागवतांशी झाली गोपनीय भेट
sakal

बोलून बातमी शोधा

SINDHIYA

संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास संघ मुख्यालयात जाऊन ते सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली होती. पण सायंकाळी ते संघ मुख्यालयात गेलेच नाही, तर रेशीमबागेतून त्यांनी सरळ विमानतळ गाठले आणि नागपूर सोडले.

ब्रेकींग - ज्योतिरादित्य शिंदेंचा सरसंघचालक प्रणाम! संघ मुख्यालयात मोहन भागवतांशी झाली गोपनीय भेट

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले आणि खासदार झालेले ज्योतिरादित्य शिंदे हे आज नागपूर दौऱ्यावर होते. नागपूर भेटीत त्यांनी स्मृती मंदिराचे दर्शन घेतले. डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळाला भेट दिली. मात्र सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट न घेताच ते निघून गेले, असे सांगण्यात येत आहे. पण नागपुरात पोचताच त्यांनी सर्वप्रथम संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतल्याचे कळते.

ज्योतिरादित्य शिंदे नागपुरात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी स्मृतिमंदिराचे दर्शन घेतले. संघ संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली. यावेळी प्रांत प्रचारक प्रसाद महानकर त्यांच्या सोबत होते. डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान म्हणजे एक प्रेरणादायी स्थळ आहे. त्यामुळेच मी इथे भेट द्यायला आलो आहे, अशी भावना यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. हे प्रेरणास्थळ आहे. येथे येऊन राष्ट्राप्रती एका दृढ संकल्पाने पुढे जाण्याची उर्जा मिळते, असेही ते म्हणाले.

संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास संघ मुख्यालयात जाऊन ते सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली होती. पण सायंकाळी ते संघ मुख्यालयात गेलेच नाही, तर रेशीमबागेतून त्यांनी सरळ विमानतळ गाठले आणि नागपूर सोडले. नागपुरला भेट देणारे ज्योतिरादित्य हे तिसरे शिंदे आहेत. यापूर्वी त्यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे व आत्या वसुंधराराजे शिंदे यांनी रेशिमबाग स्मृतिस्थळाला भेट दिली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आज नागपुरातच होते. त्यांची भेट न घेताच शिंदे यांनी नागपूर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

ज्योतिरादित्य यांच्या संपूर्ण नागपूर दौऱ्यात ते संघ मुख्यालयात गेलेच नाही. तर मग त्यांनी सरसंघचालकांची भेट केव्हा व कोठे घेतली, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका सूत्राने नमूद केले की, नागपुरात पोहोचताच ज्योतिरादित्य सर्वप्रथम संघमुख्यालयात गेले. तेथे त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या वेळेपर्यंत ते नागपुरात आहेत, याची माहिती कुणालाही नव्हती. त्यानंतर रेशीमबाग परिसराला भेट दिली आणि इतर ठिकाणी भेटी दिल्या. रेशीमबागेत पोहोचेपर्यंत ते नागपुरात आल्याची माहिती कुणालाही नव्हती. पण त्यांनी सर्वप्रथम सरसंघचालकांची भेट घेऊन नंतर उर्वरित कार्यक्रम आटोपला.

येवढी गोपनीयता कशासाठी ?
भाजपच्या राज्य किंवा राष्ट्रीय नेत्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेणे हा एक प्रघातच आहे. यामध्ये येवढी गोपनीयता सहसा ठेवली जात नाही. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी किंवा स्वतः सरसंघचालकांनी या भेटीविषयी एवढी गुप्तता का पाळली, हा प्रश्‍न शिल्लक राहिला आहे. ही भेट झाल्याचेच कुणाला माहिती नाही. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली, असेल याचाही अंदाज कुणाला लावता आलेला नाही.

वाहनाचे गूढ कायम
राष्ट्रीय स्तरावरचा मोठा नेता नागपुरात येतो. संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतो. पण याची कानोकान खबर कुणाला लागत नाही. त्यांचा ताफाही कुणाला दिसत नाही. त्यामुळे या भेटीसाठी त्यांनी एखाद्या खासगी वाहनाचा वापर केला असावा, असा अंदाज आहे. पण हे वाहन कोणते आणि कुणाचे होते, याचीही माहिती मिळू शकली नाही.

 
संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top