स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख’

३० जून शेवटचा दिवस : मुदतवाढ देण्यात फायदा कुणाचा?
Smart City Project
Smart City ProjectSakal

नागपूर - गेल्या काही वर्षात प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण न करणे हे आता प्रशासनाच्या कर्तृत्वाचाच भाग झाले आहे. यात प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली एसपीव्ही कंपनी नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनही अपवाद नाही. स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या महिन्याची ३० तारीख निश्चित करण्यात आली होती. महिनाभरात प्रकल्प पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट चित्र असल्याने या प्रकल्पाला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुदतवाढीमुळे प्रकल्पबाधितांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. परंतु मुदतवाढीचा फायदा नेमका कुणाला? अशी चर्चाही आता रंगली आहे. (Smart City Project)

नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीद्वारे पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी व भांडेवाडीचा काही परिसर असा १७३० एकर भागात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात रस्ते, जलकुंभ, सिवेज लाईन, ड्रेनेज लाईन, जलवाहिनीचे जाळे तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाला १० ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. ९ एप्रिल २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन होती. परंतु प्रकल्प पूर्ण न झाल्याने ३० जून २०२२ पर्यंत प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली होती, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली. त्यामुळे प्रकल्पाचे काम या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत कसे होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अर्थातच या प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ मिळणार, हे निश्चित आहे. परंतु कंत्राटदारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी असलेले अधिकारी नेमके काय करतात? ते कंत्राटदारांच्या सोयीनुसार तर वागत नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकल्पात अनेक अधिकारी महापालिकेचेच आहेत. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांकडून सर्वकाही मी करतो, असा हट्ट केला जात असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या, असे या प्रकल्पाचे होत असल्याचीही चर्चा आहे. या अपूर्ण प्रकल्पावर आतापर्यंत १७७ कोटी रुपये खर्च झाले; परंतु प्रकल्पाला गती येत नसल्याने बाधित नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांच्या वेदनांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

परवडणारी घरे प्रकल्पही अपूर्ण

स्मार्ट सिटीतर्फे पूर्व नागपुरात परवडणारी घरे प्रकल्पाचे काम मार्च २०१९ मध्ये सुरू करण्यात आले. दीड वर्षात अर्थात सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु हा प्रकल्पही अपूर्ण आहे. या प्रकल्पाला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत या प्रकल्पावर १७ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

दोन योजना स्थगित

स्मार्ट सिटी प्रकल्पात शेअर बाईक, ई-रिक्शा, झिरो गारबेज सोसायटी, परवडणारी घरे अशा अनेक योजना समाविष्ट करण्यात आल्या होत्या. परंतु यातील दोन योजना स्थगित करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने निर्मल नाग नदी व पब्लिक मार्केट प्लेसेस या योजना स्थगित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा भार कमी झाल्यानंतर प्रकल्पाचा वेग मंदावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com