esakal | त्यांनी आयुष्यभर पाळलं एकमेकांना दिलेलं वचन; एकाच सरणावर दाम्पत्याला अग्नी

बोलून बातमी शोधा

त्यांनी आयुष्यभर पाळलं एकमेकांना दिलेलं वचन; एकाच सरणावर दाम्पत्याला अग्नी
त्यांनी आयुष्यभर पाळलं एकमेकांना दिलेलं वचन; एकाच सरणावर दाम्पत्याला अग्नी
sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

आर्णी (जि. यवतमाळ) : विवाह हा माणसाच्या आयुष्यातील सुखद ठेवा. दोन अनोळखी जीव एकत्र येत सात जन्म जीवन जगण्याच्या आणाभाका घेतात. आयुष्याच्या मार्गावर सुख-दुख: येतात. काबाडकष्ट करावे लागते. आयुष्य सुंदर आहे, ते एकमेकांच्या संगतीने बहरत असते. आयुष्यभर सोबत राहण्याचे दिलेले वचन पाळत एकाचवेळी दाम्पत्याने अखेरचा श्‍वास घेतला. एकाच सरणावर पती-पत्नीला दिलेला भडाग्नी बघून उपस्थित आपले अश्रू रोखू शकले नाहीत.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

नारायण आकाजी गायकी (वय 75) व द्वारका नारायण गायकी (वय 71) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही आर्णी तालुक्‍यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील रहिवासी. आप्पा स्वामी महाराज यांना दैवत माणून भक्तिभावाने पूजाअर्चा करणारे म्हणून पंचक्रोशीत गायकी दांपत्य ओळखले जायचे. आठ दिवसांपूर्वी द्वारका यांची प्रकृती बिघडली. पती-पत्नी दोघेही एका खोलीत राहून एकमेकांची काळजी घेत होते.

सून व नातू सेवा करीत होते. दरम्यान, बुधवारी (ता.21) गप्पा करून दोघेही झोपी गेले. गुरुवारी (ता.22) सकाळ झाली, तरी कुणाचाच आवाज आला नाही. नातू बघायला गेला असता, आजी-आजोबा पलंगावर निपचित पडलेले दिसले. सोबत जगण्या-मरणाचे दिलेले वचन दोघांनीही पाळत जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा: विदर्भात १०२८ कोटींचे रस्ते होणार; नितीन गडकरी यांनी दिली ७७ प्रकल्पांना मंजुरी

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गायकी यांच्या घरी भेट दिली. पिंपळनेर येथील मोक्षधामात पती-पत्नीला एकाच सरणावर भडाग्नी देण्यात आला. हे दृश्‍य बघून उपस्थित आपले अश्रू रोखू शकले नाहीत.

संपादन - अथर्व महांकाळ