
‘ही केवळ धर्मपीठे नव्हे, तर परिवर्तनस्थळे; शासकीय दस्तावेजात नोंद करा’
नागपूर : महानुभावांची तीर्थस्थाने केवळ धर्मपीठे नाहीत, तर ती सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी क्रांतीस्थळे आहेत. या स्थानांचे माहात्म्य ओळखून सरकारने त्यांची नोंद शासकीय दस्तावेजात करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.`सकाळ महानुभाव स्थान माहात्म्य` अभियानाचा प्रारंभ झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर या अभियानाचा जागर करण्यात आला. महत्त्वाच्या ठिकाणी या अभियनाच्या लोगोचे अनावरण महंतांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यात सहभाग नोंदविला.
रविवारी झालेल्या बैठकीत आचार्य प्रवर न्यायंबासबाबा, वाकीकर बाबा, वासुदेवमुनी पंजाबी, कल्याणदादा वाकीकर, प्रा. भारतभुषण शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वज्ञ महानुभाव धर्म सेवा प्रतिष्ठानचे रवींद्र तिखे, विजय भरबत, नरेंद्र आमधरे, अखिल भारतीय महानुभाव मंडळाच्या अॅड. तृप्ती दिनकरराव बोरकुटे, विजय मोहोड, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्थान जिर्णोद्धार प्रतिष्ठानचे रमेश आमधरे, उमेश राऊत, विकास गावंडे, हुडकेश्वरचे सरपंच नरेश भोयर, बंडू लांबट, अतुल वानखेडे, पराग दिवाळे आणि स्थान माहात्म्य अभियानाचे समन्वयक हरिहर पांडे उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी स्थान माहात्म्य अभियान सुरू केल्याबद्दल `सकाळ`चे विशेषत्वाने आभार मानले.
६ नोव्हेंबर २०१८ चा मंदिरांच्या संबंधाने एक शासन निर्णय आहे. त्याला पूरक एक शासन निर्णय महानुभावांच्या स्थानांबाबत काढला तर स्थानांच्या नोंदणीचा प्रश्नच निकाली निघू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत जेथून मार्गस्थ झाले, ती सर्व स्थाने महानुभावीयांसाठी वंदनीय आहेत. अनेक स्थाने शेतात तर अनेक नदीकाठी आहेत. त्या स्थानांची नोंदच करण्यात आली नाही, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. सर्व जातीची माणसे तीर्थस्थळी एकत्रित येतात, एकत्र पंगतीला बसतात. समतेच्या मूल्यांची रुजवात करणारी ही केंद्रे आहेत. राज्य सरकारने याकडे लवकराच लवकर लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
या आहेत मागण्या
२३५ गावांमध्ये असलेली महत्त्वाची स्थाने आणि इतर ५०० ठिकाणी असलेल्या स्थानांची नोंद शासकीय दस्तावेजात करावी.
ज्या स्थळांपर्यंत रस्ता नाही, तिथपर्यंत पोचरस्ता व्हावा.
पंथीय स्थानांवर वर्षभर भाविक जातात. तिथे भक्तिनिवास उभारावे.
प्राचीन शिल्पकलेचे उत्तम नमुने वाघळी, लोणार, वेरुळ, सिन्नर आदी अनेक स्थानांवर दिसतात. त्यांचे जतन व्हावे.
अन्य धर्मीय स्थळी अचलपूर, देऊळवाडा, रोहर आदी अनेक ठिकाणी असलेल्या पंथीय स्थानांवरील अधिकार मिळण्यासाठी योग्य तोडगा काढावा.
पंथीय पदयात्रा काळात स्थानांपर्यंत जाणारे मार्ग प्रशस्त करावे.
Web Title: Launch Of Sakal Mahanubhav Sthan Mahatmya Campaign Social Transformation Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..